Tuesday, April 28, 2015

pinjra

सोन्याचा पिंजरा

गेले वर्षभर सतावणारी चिंता, आता पराकोटीला पोहोचली होती.
काहीच क्षणात आम्हाला आमच्या भविष्याची ‘वाट’, कळणार  (किंवा ‘लागणार’) होती.
वर्गा मधील, इतर लोकांची अवस्था, केविलवाणी होती.
कारण, होस्टेलमधील ऋणानुबंधांची, आज ताटातूट होणार होती.

एवढ्यात आमचे एक मास्तर वर्गात येतात
आम्हा चौघांना गुपचुप, एल. आय. सी. चे फॉर्म देऊन जातात.
“तुमची नोकरी पक्की!” छुपा संदेश.. असावा का याच्यात?
या सांकेतिक खुणीमुळे , आमचा जीव थोडाफार भांड्यात.

शिंडलरनी कधी अशीच यादी बनवली असावी,
यहुदी जनांची अशीच केविलवाणी अवस्था जाहली असावी.
‘तांबे, नायडू, देशपांडे, पेंढारकर’ .. मास्तरांनी आमची नावे घेतली
सोनेरी पिंजर्याची दारे आमच्यासाठी  सताड उघडली

स्वतः ची निश्चिंती  झाल्यावर, वाटते इतरांची काळजी,
माणुसकी अन मैत्रीचे कवच पांघरणारे आम्ही, ‘उत्तम रावजी' .
आमच्यात काहीच  कर्ते पुरुष, तर काही नशिबाने  ‘लकी अली’ ,
नियम वाकविणारर्या काही वशिल्याच्या  वल्ली .

यादी बनविणारा, ईश्वर म्हणावा की यमदूत ?
वशिला लावणारा, दगाबाज  की कमकुवत ?
सोप्या मार्गाने नोकरी मिळणे हे चांगले का वाईट ?
केवळ काळानेच  समजते, श्रम ‘इज आल्वेज राइट’!

सोनेरी पिंजर्याची दारे उघडली, एका वनवासाने . (चौदा वर्षाने)
वाटले,  बाहेर पडून भविष्य घडवावे, कष्ट आणि कर्तुत्वाने .
जेव्हा  सोनाराच्या कामाची  तुलना झाडू वाल्याशी ,
तेव्हा वेळ (कूपमंडूका!!) स्वतःची किंमत ठरविण्याची  .

खडतर आयुष्य कणखर बनवते.
हे समजवण्यासाठी काही “क्विक ट्रेनिंग” नसते !
अस्थैर्य हे नैसर्गिक असते.
पाण्यात पडल्याशिवाय का पोहता येते?

Sunday, April 12, 2015

Rising star

असा ही एक मनोज कुमार 

नेहमी प्रमाणे कामाची शिफ्ट संपल्यावर दीड एक मैलाची रपेट करून आमच्या कंपनी च्या गाडीतळावर पोचलो. माझे काम संपल्यावर बस मध्ये बसून तास दीड तास पुस्तक वाचण्याचा माझा नेहमीचा कार्यक्रम. गाडी मध्ये मी इतरांशी ओळख वाढवायचा प्रयत्न करत नसे , कारण ओळखीचा त्रासच  जास्त. माझ्या वाचायच्या छंदात उगाच व्यत्यय कशाला? थंडी सुरु झाली की संध्याकाळी उजेड पण कमी  मिळायचा. रुक्ष पणाची चादर पांघरली की बरेच प्रश्न आपोआप सुटतात असा माझा एक विश्वास. हे अभेद्य कवच मी बरेच दिवस टिकवले आहे. कधी अभ्यासाची पुस्तक, तर कधी साहित्य चाळून.

बस मध्ये मागील बाकांवर टवाळक्या चालू होत्या. पुढील बाकावर केळकर मास्तर शेजारयाशी वाद घालून काहीतरी पटवून द्यायचा प्रयत्न करत होते. डावीकडे बसलेल्या  बायकांची बडबड चालू होतीच. उगाचच इंग्रजी चे फाटे फोडून आपला ‘मौडर्ण’पणाची जाहीरात करणे , मधूनच आपल्याकडे इतरांचे लक्ष आहे का याची खात्री करणे इत्यादी इत्यादी ..

कांबळे आपली गाडी सर्वात पुढे कशी नेता येईल याची कस लावत होते. गाडी हमरस्त्यावर आल्यावर मागील मंडळीचे अथर्वशीर्ष चालू झाले. जप चालू असताना, रस्त्यावरील  ‘आकर्षक’ दृश्य, मान वळवून, दृष्टी आड जाई पर्यंत निरखून बघणे, हा अथर्वशीर्ष पठनाचा एक महत्वाचा भाग. बस च्या बाहेरील मंडळीला हा प्रकार गमतीशीर दिसत असावा.

या सर्व मंडळीत, एक नेहमीचे ‘गिऱ्हाइक’, आज माझ्या शेजारी येवून बसले होते. मी नेहमीप्रमाणे टाळण्याचा प्रयत्न करीत होतो. 
माझ्या मित्रमंडळीनी मला इकडून तिकडून ऐकीव माहिती दिल्यामुळे मी सावध होतो. माझे या व्यक्तीशी कुठल्याच प्रकारे जमणे शक्य नव्हते.  तसा ‘मनोज’ स्वभावाने अत्यंत मोकळा. (स्वतःबद्दल ची सर्व माहिती बस मधील सर्व लोकांना सांगून झालेली.) डिप्लोमा झाल्यावर तो आरेखक म्हणून आमच्या कंपनी मधील विद्युत विभागात लागला. 
कामाला कष्टाळू म्हणून प्रसिद्ध. पण इतरांचे “ गिऱ्हाईक” होण्यास पात्र  असलेल्या मंडळींपैकी एक. नुसती काडी लावायचा अवकाश, की “मी” पणाची जाहिरात.आज ही व्यक्ती माझ्या नशिबी. 

मागून माझा एक मित्र मला “कसा सापडलास” अस म्हणून चिडवत होता. मी आपला चेहेरा मक्ख ठेवण्याचा प्रयत्न करत होतो.

एका आठवड्यापूर्वीच मी कंपनीत राजीनामा दिला होता. चौदा वर्षांचे तप संपण्यास केवळ तीन आठवडे राहीले होते. नेहमीचा दीड तासाचा प्रवास संपणार होता, पण त्याबरोबर माझे वाचनही जवळपास संपुष्टात येणार होते.

शेजारचा चष्मा माझ्याकडे वळला होता. 
“मी मनोज”. मी बघितले आहे तुम्हाला इ.आर.सीत”.
“मी पराग”. (पुस्तका  कडे नजर वळवायचा प्रयत्न निष्फळ ठरला.)

“हो. मी ओळखतो.”  परत आपल्यास सर्व माहित असते असा अविर्भाव.. आणि मग म्हणाले,  “तुम्ही जिकडे चाललाय तिथे मी पण जाऊनआलो आहे.”

“मी एन आय बी एम जवळ राहतो.”

परत  मिश्किल हास्य.  फ्या फ्या फ्या 
“नाही. मी म्हणालो “त्या” कंपनी मध्ये मी पण गेलो होतो. चांगली झाली होती माझी मुलाखत. electrical क्षेत्रातील खूप कमी लोक आले होते. ते म्हणाले होते कि आम्ही नक्की कळवू. मस्त झाला होता इंटरव्यू . आश्चर्य वाटते , अजून बोलावले कसे नाही ते.” (मनात कदाचित असे असावे कि या माणसाला कसे निश्चित केले हेच कळत नाही. याच्या कडे तर साधी डीग्री देखील नाही!)

मी निर्ढावलेला असल्यामुळे मी दुर्लक्ष करून म्हणालो, “ थोडा उशीर झाला असेल कळवायला.” विषय वेगळी कडे न्यायला मी विचारले , “तुम्ही कुठे उतरणार ?”

“साळुंके विहार. एस .आर .पी .एफ मध्ये माझे आजोबा होते. त्यामुळे त्यामागील सर्व टेकड्यावर मी फिरलो आहे लहानपणा पासून. तसा मी मूळ साताऱ्याचा. कराड पोलीटेक्निक मध्ये शिक्षण झाले.”

आता इंजिन तापले आहे आणि गाडी सुटणार आहे, याचा मला अंदाज आला होता. मागून माझा मित्र ढुश्या देऊन माझी मजा बघत होता.
“कबड्डी मध्ये उत्कृष्ट खेळाडू..... होस्टेल मध्ये सर्व ठीकाणी प्रसिद्ध. काय  सांगायचे तुम्हाला ...” “मी एक कवी आहे.”

अरे बापरे..“..आणि मला कविता कळत नाहीत.”मी पुटपुटलो ..(मनात)

पण तो पर्यंत सुरुवात झाली होती...कुठ्लीशी वही काढून माझ्या वर हल्ला चालू झाला. आधीच माझ मराठी कच्चं. त्यावर कविते बद्दल फारशी आवड नव्हती.  पी. जी. वोडहौस च्या प्रमाणेच कवी बद्दल माझे मत.
नंतर एका मुलीला मी कसा आवडत होतो,  वगैरे यावर एक छोटीशी विरही  प्रेम कथा (स्वतः बद्दल) पण ऐकवली..माझ्याशी झालेल्या दीड तासाच्या पहिल्या भेटीत???  मी विचार करत होतो. कोण कोणास विटले असावे. तिला भेटलो नसलो तरी मी एकाला जवळपास पक्के केले होते.

यानंतर माझे गिरीभ्रमणाबद्दल, या विषयी विचारपूस केली आणि कळले की हे गृहस्त काही कमी नाही. "हिमालयात हिंडलो नसलो तरी  सातार्याला राहणार, म्हणजे सर्वच गिर्यारोहक . मी  दुचाकी वर लांबचा फेर फटका मारून आलेलो   आहे, सातारा – रायगड."  
माझ्यावर अति मारा होऊ लागला की मला काही न ऐकू येण्याची कला थोडीफार अवगत आहे आणि मी मान डोलावून उघड्या डोळ्यांनी एक डुलकी मारू शकतो. एक गोष्ट मात्र मनात बिंबवली गेली की ही  व्यक्ती गरीबीतून कष्टाने वर आली आहे. 

साळुंके विहार येई पर्यंत दुख फक्त एवढेच होते कि पुस्तक वाचून संपले नाही आणि वाचनालयात जाऊन बदलता येणार नाही. पुढील आठवडा फुकट जाणार.

नव्या कंपनी मध्ये गेल्यावर जुने बोझे कमी केल्याचे समाधान झाले आणि नवीन कामावर आगेकूच चालू होती. भारता बाहेरचे काम देशात आणायला साधारण काय पेच येतात हे प्रत्यक्ष दिसत होते. जिद्दीने आम्ही सर्व मंडळी कुठे कमी पडू याबद्दल काळजी घेत होतो. तिथे गेल्यावर कळले की  मनोज तेथील परीक्षेत उत्तीर्ण झाला नव्हता. आम्हाला अजून लोक तर हवे होतेच. माझ्या मेनेजरनी विचारल्यावर मी मनोज बद्दल शिफारस केली. जे काम करायचे होते त्यासाठी तो उपयुक्त आहे ही हमी दिली. मनोज बरोबर इतर २-३ नावे पण होती. अर्थात, आम्हाला परत विचारण्यात आले की या व्यक्तीला तर reject केले होते. 

परिस्थितीची गरज, म्हणून कधी कधी उजवा तोल द्यावा लागतो आणि हे करायचा, माझा पहिला प्रयत्न.

काम चालू झाले आणि केवळ ८ महिन्यात आम्हाला पहिला फटका बसला. आमचे डीपार्टमेंट बंद करण्यात आले. पण आम्हाला दुसरे काम देखील मिळाले. मनोज या गोष्टीची जाहिरात करीत शेजारी, जिथे मुलींचा कळप बसलेला असतो तिथे देवदासा सारखे तोंड पाडून बसले..सांत्वन करून घ्यायला.

याचे सोंग बघून या (कवी) ची कीव करावी, की वाळीत टाकावा हे कळेना. शेवटी आपलेच दात आपलेच ओठ  म्हणून दुर्लक्ष केले. गिऱ्हाईक बनण्याची स्वतःचीच तयारी असेल तर कोण की सल्ला देणार. आम्ही इतर सर्व कंबर कसून कामाला लागलो होतो. उगी उगी झाल्यावर मनोज’कुमार’ वठणीवर आले.

प्रोग्राम मधील चुका काढणे हा आमचा नवीन 'उद्योग'. कोण किती चुका काढते ही उंदराची शर्यत चालू झाली आणि त्यांचा महोरक्या मनोज होता. दुसऱ्या कोणाला पढे जाऊ द्यायच नाही, म्हणून इतरांपेक्षा नेहमी एक पाउल पुढे. एक डोळा नेहमी लिस्ट कडे. १००० वी “चूक” शोधून काढणाऱ्यांना मनोज ची अभिनंदनाची तार कारण या माणसाच्या “सहजच “ लक्षात यायचे..अशा लोकांची या गृहस्ताने यादी बनवलेली असावी.

काही वर्षानंतर माझा आणि मनोज चा  फारसा राहिला नाही कारण त्याचा मेनेजर वेगळा. त्याला शाबाशी मिळाली की त्याची पुरेपूर जाहिरात. पलीकडून एकदा या व्यक्तीचा क्लोन बनवला पाहजे, इथपर्यंत कौतुक. मध्ये कधीतरी मनोजने मेनजमेंट मध्ये शिक्षण केले. इतरांना गुंडाळआयची कला  बऱ्यापैकी अवगत होती. 
अधून मधून मला आठवण यायची, भस्मासुराची. या माणसाचा हात कधी याच्या डोक्यावर जाइल.

कधी काळी  मी ‘रेबेका’ वाचले होते. लेखिकेचे कौशल्य हे कि शेवटपर्यंत रेबेका वाईट कि चांगली हे वाचकाला शेवटपर्यंत गोंधळवून टाकेल असे रहस्य. जे काही मी मनोजच्या आस पास बघत होतो ते काहीतरी वाईट  खुणावत होते. काही वर्षांपूर्वी त्याच्या आधीच्या कंपनी मधील खास मित्राने सोडून जाताना, या माणसाने असहकार्य करून त्रास दिल्याचे सांगितले. तो काम करत असलेल्या भागात कोणीच टिकत नसे. नंतर, २ मुली जॉईन होऊन वैतागून निघून गेल्या. तिसरी मुलगी अतिरेक सहन करत होती. बर्फाच्या सुरीने वार केल्यावर काय पुरावा राहील.

मनोज ची अत्यंत श्रेष्ठ जागेवर नेमणूक झाली होती. साहेब पलीकडे होता. सर्रास मिटींग्स मध्ये वा कधी कधी जागेवर घोरत झोप काढायाचा. चाहूल लागली कि विचार करत असल्याचे दाखवायचा . पगाराची परतफेड तर सोडाच पण बाजूच्या खुर्चीवर बसलेल्यांना काय वाटेल याचा विचार करायचीही  गरज वाटत नव्हती. कमी वेळात करता येणाऱ्या कामाचा फुगवून दिलेला अंदाज आणि  शेवटी खूप कमी वेळात खूप जास्त काम केल्याचे कौतुक, आता नेहमीचे झाले होते.

यावेळी लोक कमी करायचे फर्मान आले आहे. अशावेळी एक शंका मनात येते . आपण करत असलेले काम आणि त्याबद्दलचा मोबदला हा कंपनी ला परवडत नसेल तर? अशा वेळी बिनधास्त आणि सर्वात जास्त किरकिर करणारे लोक काहीही काळजी करत नाहीत. 

आज  असे वाटत आहे की हा भस्मासुर वाचणार आणि याच्या बदल्यात एका - दोघा कामाच्या व्यक्तीचा नाहक बळी जाईल. या व्यक्तीला मीच इथे आणले हे डोक्यातून जात नाही. हे पण आठवते की हा एकावेळी चांगला कामाचा माणूस होता. 

आज ना उद्या मोहिनीच्या संमोहनाने, कधीतरी भस्मासुर तलावात उतरेल आणि केसातील पाणी दूर करण्यासाठी हात डोक्याला लावेलच.