Friday, March 3, 2023

Matri 1987

 मात्री १९८७


 अज्ञाताचा मागोवा


लक्ष्मी रोडवरील एका गल्लीत, कुठल्याशा इमारतीतील एका  खोलीबाहेर, मी गिरीशची वाट बघत बसलो होतो.  बापूकाकांबरोबर भेटायची वेळ ठरलेली होती पण ते खोलीत नव्हते.  दारावर एक चिट्ठी होती. “मला यायला उशीर होईल. दारावर किल्ली आहे. आत जाऊन बसा.” दार उघडावे की नाही असं विचार करीत असतानाच गिरीश पोचला. किल्ली शोधून दार उघडून आम्ही आत शिरलो. भिंतीवर एक लाकडी आईस  ऍक्स  लटकत होती. इंडियन माऊंटेनियर चे काही ग्रन्थ पडलेले होते ते आम्ही वेळ काढायला चाळू  लागलो.

 

१९८७ साली, इंडियन माऊंटेनियर व हिमालयन जर्नल चे अंक आम्हासाठी  माहिती मिळवण्याचे एकमेव मार्ग होते. आमच्याकडे हरीश कपाडियांकडून मिळालेला एक जपानी टोपोशीट होता आणि त्यावरून शिखरावर चढायचा साधारण मार्ग दिसू शकत होता. काँटूर मॅप वरून मी ग्राफ पेपर वर रेषा जोडून अंदाज बांधला होता. त्यावरून ४५ ते ६० अंशाचा कडा दिसत होता. अर्थात आमच्याकडे मात्री  शिखराचा एकही फोटो नव्हता. त्यामुळे त्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचायला व शिखरावरील अजून सुळके व बर्फाळ अडथळे लक्षात येऊ शकत नव्हते. काँटूर मॅप मधील रेषा ५०० फुटाच्या उंचीच्या होत्या, त्यामुळे कितीही अचूक मॅप असला तरी ५०० फुटाचा उभा कडा असला तरी कळले नसते. अल्पाइन मोहीम असल्यामुळे दोर कमी नेणार होतो. 


आम्ही म्हणूनच बापूकाका पटवर्धनांकडून काही मदत मिळेल अशी अपेक्षा ठेवून ही  भेट ठरवली होती. टेबलावर कुठल्याशा बंगाली क्लब चे पत्र पडले होते. “पटबोर्धन” याना उद्देशून ! आम्ही पुस्तकांमध्ये काही मात्री  बद्दल माहिती धुंडाळत असतानाच, जिना चढत एक प्रौढ व्यक्ति आली व दारात उभी राहिली. 

 बापूकाकांना आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो. डोक्यावर खाकी ब्रिटिशकालीन हॅट, खाकी अर्धी पॅन्ट व खाली हंटर बूट. “आई होप यू  आर कंम्फरटेबल .” असे काका उद्गारले. त्यांच्या वेशात बेफिकिरी होती. पुण्यातील सर्वात जुना गिर्यारोहक आम्हासमोर उभा होता.  काकांनी विषय काढला ,“फोन वर तुम्ही मात्रीला जायचे म्हणत होता?”

मग ते म्हणाले,  “ आधी कुठल्या मोहीम केल्यात?” 

मी म्हणालो,  “मागच्याच वर्षी आम्ही केदारनाथ शिखर चढायचा बेत आखला होता. अति बर्फामुळे अयशस्वी झाला. यावर्षी आम्ही पोस्ट मान्सून ला मात्रीचा बेत आखला.”

बापूकाका उत्तरले, “पोस्ट मान्सून इस गुड, बट यू  विल नीड  प्रॅक्टिस. आईस  एक्सपोस होतो.”

गिरीश म्हणाला, “प्रॅक्टिस म्हणून काय करू शकतो आम्ही?”

बापूकाका म्हणाले, “मी सिंहगडला cramponing करा असे सुचवीन. पोटॅटो पॉईंट च्या खालचा कडा .“

मी विचार करत होतो , “यामुळे क्रॅम्पॉन ची नांगी तुटली तर मिळवणार कुठून?”

माझा विचार त्यांनी ओळखला असावा. बापूकाका म्हणाले, “आय  यूज्ड टू  डू इट अँड इट हेल्प्स. मुरुमावर  प्रॅक्टिस करा.” 

काकांनी टेबलाच्या ड्रॉवरमधून  तीन महिमांचे संच काढले आणि आम्हाला xerox काढून परत द्यायला सांगितले. 

दोन मोहीम पश्चिम बंगालच्या होत्या. एका मोहिमेत प्रवीर नावाचा गिर्यारोहक वरून घसरल्यामुळे मृत्युमुखी पडला. कोठलीच मोहीम वरपर्यंत चढू शकली नव्हती. "मात्री  अजून व्हर्जिन आहे. ", असे म्हणत. बापूकाका नी  स्वतःच्या मोहिमेबद्दल सांगायला सुरुवात केली. 

“दोन हाय अल्टीट्युड पोर्टर, एक कूक होता आमच्या बरोबर. मात्री  शेजारीच मात्री  त्रिशूल नावाच्या लहान शिखरावर आमची मोहीम होती. या भागात कोणीच गेले नसल्यामुळे, फार माहिती आम्हालाही  नव्हती.”

बापूकाकानी काहीसे धूसर फोटो दाखवत मात्री त्रिशूल बद्दल माहिती सांगितली. पण या सर्व फोटोंमध्ये मात्रीचा एकही फोटो नव्हता, त्यामुळे आमच्या साठी कोडे अजूनही तसेच होते. 

एका कागदावर त्यांनी नकाशा काढायला सुरुवात केली. चिडबास पासून १ किमी पुढे गेल्यावर, डावीकडे मात्री नाला लागतो. तिथून वळल्यावर एका  गॉर्ज  मध्ये आपण शिरतो. सकाळची पाणी कमी असताना गॉर्ज  निमुळती होईल तिथे नाला क्रॉस करा. कदाचित river crossing  साठी दोर लावावा लागेल. तिथून एक शंभर फूट रॉकवर दोर लावायला लागेल. मग तुम्ही शेफर्ड कॅम्प ला पोचाल. ग्लेशीयरच्या मुखावर बेस लावा. “


नकाशाचा कागद भरत चालला होता. आम्ही मूकपणे बघत होतो. 

“पुण्यातून मिनू मेहताच्या मोहिमेत यश नाही मिळाले. डावीकडे जी शाखा उतरते आणि मात्री त्रिशूलला मिळते तिथून चढायचा विचार अजिबात करू नका. अपयश येईल.”

“गेट टू  द बॉटम ऑफ द रिज दॅट  कॉम्स डाउन फ्रॉम द  ट्वीन पिक्स. म्हणजे मात्री ची उजवी शाखा. ”

“तुम्ही ट्विन्स च्या बेस ला जरी पोचलात तरी यश मिळाले असे समजा.”


या शेवटच्या वक्तव्यामुळे माझ्या मनात राग उफाळला. पहिल्या भेटीत त्यांनी आमची लायकी काढायची काहीही  गरज नव्हती. गिर्यारोहणात त्यांनतर मी एक नियम नेहेमी पाळला. कुणाचाही पाणउतारा होईल किंवा त्याची इच्छाशक्ती कमी होईल असे बोलणे टाळायला हवे. प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या मनात कुठलेतरी पूल बांधत असते. सद्यपरिस्थितीत ते स्वप्न पूर्ण  करण्याची ताकद कदाचित त्याच्याकडे नसेल, पण वेळ मिळाल्यास कोणाची मजल कुठपर्यंत पोचेल हे कोणीच सांगू शकत नाही. प्रयत्न करायची इच्छा, ही स्वप्नातील गोष्ट साकारू शकते. कोणा  दुसऱ्याने  वेड्यात काढले, तर त्याकडे कानाडोळा करणे, हे आपल्या हातात असतेच. 


माझी व बापूकाकांची ही पहिली व अंतिम भेट.  पुढे भेट झाली नाही. त्यांच्या कर्तृत्वा  बद्दल आदर आहे आणि आम्ही अल्पाइन पद्धती कडे वळायचा निश्चय ठाम होत गेला त्यातले  थोडे श्रेय आमच्या आधीच्या बापूकाकांसारख्या गिर्यारोहकांकडे जाते. 


फारशी माहिती मिळाली नसल्यामुळे आमची उत्कंठा वाढत चालली होती. क्लाइंबिंग टेकनिक  सुधारायला वाव होता आणि आम्ही बापूकाकांसारखे हाय अल्टीट्युड पोर्टर नेणार नव्हतो, त्यामुळे आम्हाला अजून कणखर बनणे गरजेचे होते. कमी माहिती हा शोधयात्रेचा पाया. 


आजकालच्या जगात गुगल मुळे , प्रत्येक गोष्ट आपल्याला उपलब्ध असल्यामुळे, नवीन शोध घेताना जी मजा पूर्वी येत होती ती आता लुप्त होत चाललीय.  

सगळे predictable  झाल्यावर adventure संपत चालले आणि आता फक्त यश मिळण्यासाठीची धावपळ सुरु आहे. 

~~~~


स्वप्नपूर्ती कडे पहिले पाऊल 



आमचा म्होरक्या आनंद केळकर, हा मुंबईला स्थायिक झाला होता. ली आयकोकाच्या पुस्तका वरून त्याला काहीसे स्फुरण मिळाले असावे आणि त्याने यांत्रिक आरेखना पासून स्वतःची सुटका करून मरीन इंजिन सेल्स मध्ये उडी मारली. कुठलासा ग्राफ दाखवून एकदा मला दाखवले की कम्पनीचा जी एम, हा मार्केटिंग अथवा प्रोडक्शन मधलाच असतो. त्याने आपली लाईन तशी बदलली होती. 

मला कोठल्याही कम्पनीचा  जी एम व्हायचे नव्हते पण मला आनंदच्या धडपडीचे कौतुक होते.  मात्रीवरून त्याने लक्ष काढून घेतल्याचा भास होत होता. त्याचे लग्न होऊन वर्ष झाले होते आणि तो आता  आमच्यासारखा सडाफटिंग  नव्हता. 


मोहिमेची जबाबदारी गिरीश आणि माझ्यावर आली  होती. आनंद पुण्यात आला, की अलका थिएटर समोरच्या हॉटेल मध्ये, अनेक चहाचे कप संपवत,  आमचे प्लॅन चालू असायचे. हॉटेलचा मालक उठवायला येईल अशी शंका आली,  की अजून एक चहाची  फेरी व्हायची. 


केदारनाथ मोहिमे पेक्षा कमी खर्चात कशी मोहीम करता येईल का,  हा मुख्य मुद्दा होता. वर्षापूर्वीच झालेल्या मोहिमेचा एकूण खर्च साधारण ३५००० रु होता.  तेंव्हा आम्ही एक कुक बरोबर घेतला होता आणि तो कमी केल्यास थोडा खर्च वाचेल हा अंदाज होता. ज्या कॅम्प पर्यंत सर्पण  मिळेल, तिथपर्यंत ज्वारी-बाजरी च्या भाकऱ्या कराव्यात, असा आंनद चा विचार होता. अर्थात, भाकऱ्या तोच करणार असल्यामुळे आमची काही ना नव्हती. कुठे तरी एवढ्या उंचीवर, एवढ्या थंडीत भाकऱ्या का कराव्यात असे वाटत होते. हा दोन तीन दिवसांचाच बेत असल्यामुळे फारसा विरोध झाला नाही. बेस कॅम्प पर्यंत केरोसिन स्टोव्ह लागेल. त्यापुढे बर्फात सॉलिड फ्युएल  व स्पिरिट चा स्टोव्ह, असे एकमत झाले. सॉलिड फ्युएल च्या टिक्क्या हाताळायला सोप्या होत्या. स्पिरिट कधी वापरले नव्हते. साध्या वातीच्या स्टोव्ह मध्ये स्पिरिट भरून बघायला पाहिजे असे वाटले आणि ती जबाबदारी माझ्याकडे सोपवण्यात आली. 


गिरीशच्या घरी आमच्या भेटी गाठी चालू होत्याच. जवळच्या एका हॉस्पिटल मधून स्पिरिटची बाटली आणून वातीच्या  स्टोव्ह मध्ये ओतली. काडी लावताच प्रचंड मोठा जाळ  झाला आणि काही मिनटात स्टोव्हच्या वरची प्लेट लाल भडक झाली. Calorific  value जेवढी जास्त, तेवढा स्टोव्ह मध्ये कंन्ट्रोल  हवा. 

हा उपद्रव जर तंबूत केला असता, तर फक्त फ्रेम  शिल्लक राहिली असती. 

साधा वातीचा स्टोव्ह स्पिरिट साठी उपयोगाचा नाही. परदेशातील गिर्यारोहक वापरतात असा स्टोव्ह पैदा करावा लागेल हे आमच्या लक्षात आले. आनंदने  मुंबईला कुठूनतरी तसा स्टोव्ह विकत घेतला. 


मात्री एक अवघड शिखर असल्यामुळे, आम्हाला सराव करणे गरजेचे होते. त्यासाठी, खडा पारशी चढवा असा प्रस्ताव मी मांडला. माझी मित्रमंडळी नुकतीच चढून आली होती आणि त्यामुळे गिरीश आणि मला या चढाई बद्दल आकर्षण होते. खडा पारशी चढणारा तिसरा ग्रुप आमचा असू शकतो,  तसेच, पदभ्रमण  सुरु करताना हा विचार काही वर्षांपूर्वी डोकावून गेला होता की कधीतरी या सुळक्यावर चढाई केली पाहिजे.  आनंदला फारसा असल्या चढाईमध्ये रस नव्हता आणि तो आम्हाला  परावृत्त करायचा प्रयत्न करत होता. “आपण मोठ्या चढाया करण्यासाठी बनलेली आहोत आणि अश्या किरकोळ गोष्टीत काय वेळ घालवायचा. “ आमच्यामते अशी चढाई केल्यामुळे  आत्मविश्वास वाढेल आणि पुढील मोहिमेच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल असे माझे मत होते.

 

मोहिमेचे सदस्य वाढत होते. आनंद,  गिरीश, हेम्या परदेशी आणि मी नक्की होतो. गिरीश आणि मी मिलिंद वितोंडे चे नाव सुचवले. मिलिंद,  गिरीश व मी नुकताच ढाक बहिरीचा सुळका चढला होता. गिरीशचा सुळक्यावरून फॉल  झाला असताना आम्ही अडवला होता. अशा  प्रसंगानी  मैत्री अजून दृढ होते. मिलिंद त्याच्या प्रगतीच्या वाटेवर होता आणि इंजिनीरिंगच्या  शिक्षणामुळे आमच्या चहापार्टीसाठी त्याला क्वचितच वेळ मिळायचा. आवश्यक सहभाग नसल्यामुळे आंनद  जरा त्याच्यावर खट्टू  होता, पण गिरीश आणि मी त्याची बाजू सांभाळून घेत होतो.  


हेम्याचा मामा आमच्याबरोबर बेस कॅम्प मॅनेजर म्हणून येण्यास उत्सुक होता. काही वाईट प्रसंग  ओढवला तर त्याचा आम्हाला उपयोग होणार होता, तसेच त्याच्या  वर्कशॉप मध्ये आम्ही स्नो अँकर (डेड मॅन), स्नो स्टेक  आणि रॉक पिटॉन तयार करून घेतले होते. हे  पिटॉन घेऊन मी सातारा रोड वरील आदिनाथ सोसायटी समोर एका लोहाराकडे नेले. कारच्या लीफ स्प्रिंगचे हे पिटॉन  ठोकून निमुळते करायला एक दोन तास गेले. आंनदने कुणा  मित्राकडून ब्रिटन मधून, १६ कॅराबिनर मागवले व त्यामुळे आमची खडा पारशी साठी थोडी तयारी झाली होती.

  

माझ्याकडे फ्रेमची टुरिंग रकसॅक होती, ज्याचा गिर्यारोहणाची फारसा उपयोग होत नव्हता. लक्ष्मी रस्त्यावरील साठे गादी  कारखान्यात नुकतेच सॅक बनवण्याचे काम सुरु झाले होते. मिलिंद व मी आम्हाला पाहिजे अशी हॅवर सॅक शिवायला दिली, ज्यात वरून पाण्याची बॉटल, आईस हॅमर व ऍक्स लटकावता येईल, असे बंद होते. (यामध्ये इनर फ्रेम नव्हती.) साठ्यांकडून आम्ही क्लाइंबिंग  हार्नेस देखील बनवून घेतल्या. या सगळ्याचे फर्स्ट हॅन्ड टेस्टिंग थेट सुळक्यावर होणार, याचा अंदाज साठ्यांना दिला होता. 


सिंबायोसिस पॅगोडाच्या मागील दगडाच्या खाणीत पॉवरचे कॅनवास शूज वापरून, प्रस्तरारोहणाची प्रॅक्टिस चालू होती. पॅट्रिक इडलिंगरची एक फिल्म “१००० ft  फ्री क्लाइंब “ गिरीप्रेमींच्या एका कार्यक्रमात बघितली. आणि मग काय.. फर्ग्युसन मागील छोट्या टेकडीवरच्या खाणीत, हौस म्हणून, आम्ही ‘आमचे फ्री क्लाइंबिंग’ चालू झाले. अर्थात, कुठे धडपडलो तरी फारशी इजा झाली नसती. 


खडा पारशी चढण्याची तारीख ठरली. आनंद मुंबईहून येणार होता. मिलिंद ची परीक्षा असल्यामुळे तो सहभागी होऊ शकत नव्हता.  पुढे काय घडेल यासाठी आम्ही उत्सुक होतो. 




~~~ 

गॉडफादरची पुनश्च  भेट 


“बरेच लोक  विधिलिखिताच्या विरुद्ध प्रवास सुरु करतात. वेळ आणि  नशीब, सहसा, अशाना योग्य मार्गावर आणून सोडते.”


-मारिओ पुझो 


संध्याकाळची वेळ. ठिकाण -घाटघर 

एसटी चा प्रवास उरकून हेम्या, गिरीश व मी शाळेत आनंदची वाट बघत बसलो होतो. चढाईला सुरवात करायला मी उतावीळ होतो आणि अजून रात्र जायची होती. हेम्या मला काहीतरी लेक्चर देत होता.

आनंद आणि हेम्या हे अगदी लंगोटी मित्र. एकदा आनंद म्हणाला होता,  “हेम्या म्हणजे माझा लुका ब्राझी.”

मी  ‘लुका’ची गम्मत ऐकत होतो,  इतक्यात, लांबून हेडटॉर्चचा प्रकाश पडला. 

आनंद नाणेघाट चढून वर आलेला होता आणि सोबत दोन मुली होत्या! आमच्या कळपात कधी मुली असायची शक्यताच नव्हती आणि आनंदने तीही कमी भरून काढली होती . 


“भारती  आणि रंजना जुळ्या बहिणी.  कल्याणला भेटल्या. त्या पण जीवधनला जाणार होत्या, त्यामुळे मीच म्हणालो,  आमच्याबरोबर चला म्हणून.” आनंद म्हणाला. 

मनातल्या मनात मी विचार केला, “त्यामुळेच  आता माझ्या  जिभेला लगाम द्यावा लागणार.”

आनंद चा पोशाख ठरलेला. हिरवा शर्ट पँट आर्मी युनिफॉर्म सारखा. आता जर्मनीतहून आणलेली इनर फ्रेम रकसॅक.  सिगरेट शिलगावत इकडच्या तिकडच्या गप्पा करत आम्ही परत शाळेत पोहोचलो. 


दोन वर्षांनी पुन्हा एकदा, आम्ही परत एकदा शाळेच्या व्हरांड्यात कॅरीमॅट पसरल्या. पेझल टॉर्चच्या प्रकाशात  आनंद खिचडी तयार करु लागला. देव आनंद च्या सिनेमातील गाणी गुणगुणणे सुरु होते. भांडी घासायचे काम माझ्याकडे होते. 


कोंबडा आरवायच्या आधीच आम्ही जीवधनच्या वाटेवर पोहोचलो. या वेळी, वाट नीट माहित असल्यामुळे, गडावर पटकन पोहोचलो आणि पलीकडच्या घळीतून खाली उतरून  सुळक्याच्या पायथ्याला गेलो. १५० फुटी गरवारे नायलॉनचा सेलिंग रोप हार्नेसला बांधून , मी प्रथम चढाईस सुरुवात केली. गिरीश मला बिले देत होताच. ४०-५० फूट चढून मला एक पिटॉन दिसला पण माझा हात पोहोचत नव्हता. मी (नको तिकडे) माझ्या आयुष्यातील पहिला पिटॉन एका भेगेत मारला. मी अडकलेला बघून, आनंद तिथवर चढून आला होता. मी भरकटल्याजागेवरून परत त्याच्याकडे उतरलो आणि मग सरळ वर चढत गेलो. माझ्याकमरेला  दोराची शिडी होती (ज्यामधले rung  कास्ट आयर्न चे होते,.. जॉर्ज मेलरी काही कीव आली असती), ती शिडी अडकवत मी १०० फुटवर उजवीकडे वाट कापत गेलो. आता माझ्या मागेच गिरीश येऊन पोचला होता. त्याच्या खाली आनंद होता व इतर मंडळी तळाला तयार उभी होती. प्रत्येक माणसाची चढाई चालू असताना, इतर दोन लोक नुसते वाट बघत बसत होते, हे काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. 


मी सुळक्याच्या ट्रॅव्हर्स नंतर अशा ठिकाणी पोचलो, जिथून  वरचा चढ उभा आणि अंगावर येत होता.  शिडी लटकवली आणि ती यावेळी हवेत  लटकत होती. मी त्यावर आरूढ झाल्यावर, स्वतःला वरच्या बोल्टला अडकवून घेतले. पुढचे काही बोल्ट चढल्यावर, माझ्याखाली हजार-एक फुटाची  मोठी दरी होती. उन्हानी  अंग भाजून निघाले होते आणि पाण्याची बाटली खाली होती. 

अंगावरचा चढ अजून एक दोन बोल्ट नंतर कमी होत असला तरी माझे पाय लटपट कापू लागले. उजवीकडे कात्राबाईचा कडा आणि त्यासमोर काही गिधाडे चकरा  मारत  होती. असे वाटले, की ही  माझ्यावर डोळा ठेवून आहेत आणि त्यांच्या पार्टीची तयारी चालू आहे. 


मी सुळक्यावर अडकलेल्या इतर दोन लोकांचा विचार केला आणि लक्षात आले की वर पोचेपर्यंत संध्याकाळ होईल. मग असच हळू हळू खाली उतरावे लागेल. या सगळ्याचा मला कंटाळा आलेला होता. मी गिरीश ला म्हणालो,  “ मी आता दमलो आहे. मला हे झेपणार नाही.” गिरीश म्हणाला, “मी प्रयत्न करून बघतो.” मी त्याच्या पर्यंत खाली उतरून गेलो आणि आम्ही पोझिशन स्विच केली. 

गिरीश ओव्हरहँग  ला जाऊन भिडला आणि लटकल्यावर त्याचीही अवस्था माझ्यासारखीच झाली. कदाचित अति उन्हामुळे, आम्ही दोघेही थकलेलो होतो. 

आम्ही इथून खाली जायचा  निर्णय  घेतला. आम्ही सर्व सामान घेऊन खाली कूच केले. आम्ही १००ft  दोर लावलेला असल्यामुळे सगळ्यांनी एक एक करून जुमारिंग केले आणि त्यांच्या चढाईचा आनंद द्विगुणित झाला.

मी एका हरलेल्या खेळाडूप्रमाणे उदासीन होतो. 


जीवधनवरच्याच्या तळ्याशेजारीच आम्ही संध्याकाळी जेवण बनवले आणि उघड्यावर झोपायची तयारी केली. मनात एकच खंत होती;  मी खूप लवकर माघार घेतली म्हणून. सर्व कारणे पडताळून बघितली तेव्हा लक्षात आले.

 

१)   एका वेळ दोनच आरोहक एका दोराला असले, तर प्रत्येकाला, सतत थोड्या थोड्यावेळाने, आरोहण करता येते. तिसरा आला की वेळ खूप लागतो. दोनीही आरोहक सारख्या कुवतीचे असावेत. चार लोक असतील तर दोघा - दोघांच्या दोन जोड्या बनवाव्यात. 

२) पहाटेच आरोहण चालू करायला हवे, कारण नंतर उन्हाने जीव कासावीस होईल. (पाणी बरोबर असावे.)

३) आम्ही मात्री पर्वतासाठी पूर्णतः तयार नाही हे अवघड सत्य. जे खडा पारशी वर घडले तेच मात्रीवर होऊ शकते. मोहिमेचे सदस्य असे रांगेत एका रोपवर राहिले, तर प्रत्येकाला बिले देऊन वर घेताना  उशीर होत जाईल. 

४) दमलेल्या अवस्थेत परतायचा निर्णय कधीही घेऊ नये. विश्रांती घेतल्यावर, सर्व शक्यता पडताळून, मगच निर्णय घ्यावा. 

५) माझी  स्वतःची कमजोरी म्हणजे एका ठिकाणी उभे राहिले की वाटणारी आणि वाढत जाणारी भीती. मला सतत कामात जुंपायला हवे. (मस्ट कीप मूविंग. ) 


हे सारे माझ्या डोक्यात चालू असताना, इतर मंडळी मात्र मजेत वेळ घालवत होती. या पराजयामुळे माझ्यात एक कायमचा बदल होणार होता आणि त्याची मला तेंव्हा कल्पना नव्हती. रंजनानी मोहिमेत सहभागी व्हायची इच्छा दाखवली आणि आनंदानी सर्वांना विचारून होकार दिला. रंजना हॉकी खेळाडू होती आणि तिने बेसिक माऊंटेनिरिंग  कोर्स केलेला होता. 


पुण्याला परत पोचल्यावर सामानाची  जुळवाजुळव करून ऑगस्ट मध्ये निघायची तयारी करायची होती. नुकतीच ए एम आई ई ची परीक्षा ही झाली होती. कुणा उपटसुंभानी पेपर सेट करताना एक सोपा bending moment चा प्रश्न cwt चा फोर्स वापरून बऱ्याच लोकांची दांडी गुल केली होती.

घरी आल्यावर वडलांना विचारले हे cwt म्हणजे???? 

"(अरे बेमट्या), cwt म्हणजे century weight. fps सिस्टीम मधले!  "

मला प्रश्न पडायचा. यांना मेट्रिक सिस्टीम शी काय वैर आहे म्हणून. मेहमूदच्या पडोसन मधला डायलॉग ( मन्ना डेच्या स्वरात..)

' ये चीटिंग... येक पे रेहेना..गोडे बोलना या चतुर .... अय्यो गोडे तेरे…'

वैतागून मी dme ला एडमिशन घेतली. (Metric) येक पे रेहेना म्हणून..





~~~~~


इनर लाईन परमिट 


तिबेट सीमेपासून ८० कि मी चा पट्टा म्हणजे इनर लाईन ..या पट्ट्यात मात्री शिखर स्थित होते. गंगोत्रीला जाताना भैरोघाटी जवळ नीलांगची पाटी दिसते, हा रस्ता, गर्तांग गली मधून तिबेट सीमे पर्यंंत जातो. ब्रिटिश काळी नंगापर्वत मोहिमेतील जर्मन तुकडी ला ब्रिटिश सैनिकांनी काबीज करून डेहराडून मधील कॅम्प मध्ये कैदेत ठेवले. हेनरिक हेरर याच रस्त्यावरून तिबेटला पळून गेला. निलंग गाव हे मात्री शिखराच्या मागच्या बाजूला स्थित. गंगोत्री हिमनदी मधल्या शिखरांवर जायला क्वचितच हे परमिट लागते, पण मात्री व श्री कैलाश हे अपवाद . या परमिट साठी, निघण्या आधीच मी पत्र व्यवहार सुरू केला होता.


गेल्या तीन दिवसांच्या प्रवासात बरीच विघ्ने आडवी आली. दिल्लीची बस ऋषिकेशला उशीरा पोचल्यामुळे आम्ही चक्क एक दिवस/रात्र बस स्थानकावर राहिलो होतो. सामानाजवळ आळीपाळी ने राखण करत दिवस आणि रात्र काढली. ऑगस्ट महिना सुरु होता आणि धो-धो पाऊस लागला होता. वरचा घाट धुक्यात होता.मनात शंका कुशंका घर करू लागल्या. शेजारच्या धाब्यावरून वनस्पती घीच्या तडक्याचा वास अधून मधून आमची भूक पेटवत होता. मटर पनीर , दाल- रोटी वर ताव मारून गप्पा रंगल्या.


दुसऱ्या दिवशी पहाटे ची बस पकडून उत्तरकाशी गाठली, तर उत्तरकाशीच्या अलीकडे, एक मोठी लँड स्लाईड झाली होती. सर्व सामान बसवरून उतरवून घाटाखाली नदीच्या शेजारच्या रस्त्यापर्यंत दुसऱ्या बस वर चढवावे लागले. 


गोमुख हॉटेलच्या दोन खोल्या आम्ही घेतल्या होत्या. एका मध्ये खिचडी शिजवणे चालू झाले कारण दोन दिवस चक्का जाम होता. हॉटेल बंद. वाहने ही बंद. 

बचन सिंग गुसाईं हा तिकडचाच एक कम्युनिस्ट नेता होता आणि त्यांनी आता मोहीमा न्यायचा धंदा सुरु केला होता. त्यानेच आम्हाला पोर्टर पुरवले. त्याचा भाऊ, गोविंदसिंग हाय अल्टीट्युड पोर्टर म्हणून , मात्रीला येण्यास उत्सुक होता, पण आम्ही त्याला नकार दिला व कारणही सांगितले. "ही मोहीम अल्पाइन पद्धतीची आसल्यामुळे सर्व रोप फिक्सिंग आम्हीच करणार आहोत. शेरपा न्यायची गरज नाही. "


वसंत लिमये, हे मुंबईचे प्रसिद्ध गिर्यारोहक, भांडारी हॉटेल मध्ये उतरले होते. त्यांनी कांचनजंगा शिखराचा स्लाईड शो बघण्यासाठी आम्हाला आमंत्रित केले. आमच्याबरोबर काही एन आय एम चे काही शिक्षकही बसले होते. संध्याकाळ झाल्यावर शो सुरु झाला. माझे काही मित्र या मोहिमेत होते त्यामुळे या मोहिमेबद्द्दल उत्सुकता होतीच. वसंतच्या विलोभनीय वक्तृत्वामुळे मी भारावून गेलो. वसंतला भेटायची ही पहिलीच वेळ. उत्कृष्ट फोटोग्राफी आणि सुंदर कथन हे मी पहिल्यांदाच बघत होतो.

शो नंतर आम्ही भारावलेल्या अवस्थेत बाहेर पडलो. नव्या स्फूर्तीने मी स्वतःच्या छोट्या मोहिमेकडे बघू लागलो. अल्पाइन पद्धतीत विजयाची शक्यता कमी. शेरपा नाही, कमी दोर व शिखरा बद्दल अतिशय कमी माहिती, हे सर्व कांचनगंगा मोहिमेच्या अगदी विरुद्ध.


डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या ऑफिसात इनर लाईन परमिट मिळाला. परमिटप्रमाणे आम्हाला टेलीफोटो लेन्स नसलेला एकच कॅमेरा न्यायला परवानगी होती. परतल्यावर कोडॅक स्लाईड रोल त्यांच्याच सुपूर्द करायला लागणार होते. 

उत्तरकाशीत बेसकॅम्प पर्यंत पुरेल असे रॉकेलचे कॅन घेतले. चक्का जाम सुटल्या दिवशी, आम्ही बसने संध्याकाळी गंगोत्रीला पोचलो. 


पंडितजीच्या आश्रमात मुक्काम ठोकला. पोर्टर मंडळी स्वयंपाकाला लागली. आम्ही गावात चक्कर मारून नदीपल्याड एक फेरी मारली. 

खुशाली कळवायला घरी पत्र पाठवले. त्याकाळी, गंगोत्रीत फोन देखील नव्हता. 

पत्र घरी पोचेपर्यंत आम्ही कॅम्प१ ला पोचलले असू. ही खुशाली कळवून फारसा फायदा नव्हता केवळ एक बंधन म्हणून ही सवय करून घेतली होती.


आजच्या काळात मोबाईलनी आपण खुशाली कळवतो. लोकेशन पाठवू शकतो. पण हे सारे करून आपण आपली काळजी अजून वाढवून घेतली आहे का? अति माहिती ही डोकेदुखीच. 

शिखराचा ३d मॅप देखील गुगल केल्या मिळतो. आपल्या आधीच्या मोहिमांचे फोटो उपलब्ध असतातच. 

या सगळ्यात, सर्व अपादाक्रांत शिखरांची virginity हरवल्यासारखी झाली आहे.


त्याकाळी, raiders of the lost arc मधील इंडियाना आम्हाला खूप रूचायचा. कुठेतरी आमच्यात साम्य होते. इतिहास शिकवणाऱ्या गबळ्या प्रोफेसर चे जसे एका साहसी अर्किओलॉजिस्ट मध्ये रूपांतर होते तसेच आमच्या बाबतीत एका ड्रॉइंग ऑफिस मधील आरेखकाचे रूपांतर गिर्यारोहकात होत असे, वर्षातून एकदा. Abba च्या ' निना, प्रीटी बेलरीना' सारखे.





~~~~~

दगडांचे साम्राज्य

गंगोत्रीहून ६ वाजता निघायचे ठरले होते. कडाक्याच्या थंडीत कोणी ढाबे उघडलेले नव्हते. शेवटी सात वाजता एका दुकानात आलू पराठा आणि चहा मिळाला. पोर्टर लोक निवांत होते आणि ते फार ऊशीर लावत होते.  वैतागून  आम्ही पुढे चालायला लागलो. आम्ही प्रत्येकी १५ किलो समान वाहत होतो आणि पोर्टर २५ किलो. 

सकाळचे धुके ओसरत होते आणि उन्हाची तिरपी किरणे उजव्या बाजूच्या कड्यावर नाचू लागली होती. त्यावरील बर्फाचे  पाणी वितळून दगडाची चकाकी वाढवू लागले.  अजून फारसे लोक रस्त्याला लागले नव्हते. गंगोत्री पुढे एक छोटे देऊळ लागले आणि त्या परिसरात पाखरांचा चिवचिवाट चालू होता. वातावरण अतिशय प्रसन्न होते आणि आता वाहनांचे आवाज शमले होते, १.५ महिन्यासाठी!

वर्षभराच्या खटाटोपी नंतर आम्ही शेवटी हिमालयात दाखल झालेलं होतो. ज्या गोष्टीची आम्ही वर्षभर प्रतीक्षा केली, ती साध्य झाल्यावर खूप उत्साही वाटत होते. ड्रॉइंग ऑफिस मधून महिन्याभरासाठी  सुटका झाली होती. पुण्याहून निघताना पाऊस होता आणि गंगोत्रीत देखील पावसापासून सुटका झाली नव्हती. दूरवर सुदर्शन पर्वताचेही धूसर दर्शन झाले होते. उजवीकडे नदी पल्याड एक आश्रम दिसत होता. आमच्यासमोर एक भगवे जोडपे तीर्थयात्रेसाठी निघालेले दिसत होते. ‘जय रामजीकी’ म्हणत आम्ही चार गप्पा मारल्या. 

चीडबासाच्या आधी एका झऱ्या वर तहान भागावली.  Chemical पॅकिंग ची रिकामी  बॉटल आम्ही वॉटरबोटल म्हणून वापरात असत,  कारण तिला सॅकवर पट्ट्याने  बांधता येत असत. प्रत्येक थांबायच्या ठिकाणी विंड चीटर सॅक मधून उघडून आम्ही अंग झाकून घेत असू. घामावर वारा लागून शरीराचे तापमान पटापट कमी होत जाते, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक रहावे लागते. आमच्याकडे कुठलेही फेदर जॅकेट नव्हते. केवळ एक पातळ विंड चीटर होते. अंगात खाकी कॉट्सवूल  चे मिलिटरी चे शर्ट घातले होते. (हे शर्ट आठवड्याने आम्ही बदलत असू. )

गंगोत्रीपासून आठ कि. मी.  वरील चीडबासच्या धाब्याच्या अलीकडे एक मोठा नाला एका गॉर्ज मधून बाहेर पडताना दिसला. हाच कदाचित देव पर्वत वरून खाली येणारा नाला असावा. देव पर्वत, चिडबास पर्वत आणि मात्री यांच्यामध्ये एक मोठी दरी होती. इथून देखील मात्री शिखरावर जायचा मार्ग सापडू शकेल असे वाटत होते.

चिडबास धाब्यावर नाश्ता केल्यावर, आम्ही चिडबासचे जंगल ओलांडून भुजबासच्या वाटेला लागलो. यानंतर हिरवळ कमी होऊ लागली. भुजपत्राची झाडे असलेल्या जंगलातून, लांबवर भागीरथ पर्वतमाला दिसू लागली. भागीरथीच्या उजव्या बाजूला मंदा पर्वत मला दिसू लागला भागीरथीच्या डावीकडे एका फण्यासारखा  वासुकी पर्वत उभा होता.

 चिडबास सोडल्यावर एक किमी नंतर, डावीकडून एक मोठा ओढा खळखळत खाली उतरत होता. त्यामागे एक खिंड होती, जी पार करून आम्ही शेफर्ड कॅम्प पर्यंत पोचणार होतो. खिंडीवर चतुर्भुज पर्वत दिसत होता. (उंची 21,831 फूट ). भोजबासच्या रस्त्यावर ओंडके टाकलेला ओढ्यावरचा जो पूल लागतो, त्याआधीच, आम्ही डावी कडे मात्री पर्वताच्या दरीत शिरलो.  एका बकरीच्या पायवाटेने आम्ही वर चढलो, तो एक न संपणारी 'दगडाची खाण'  लागली ज्यामधून मात्री नाला वाहात होता. डावीकडच्या कड्यात एक कपार होती, ज्यात एक साधू तप करत बसला होता. 

आम्ही इतर मंडळींची वाट बघत बसलो. पोर्टर यायला  बराच उशीर झाला होता. तिथे आल्यावर पोर्टर काही पुढे जायला  तयार नव्हते. ओढ्याचे पात्र दुपारच्या उन्हात अजून पसरले होते. त्यातून, ओझे घेऊन पार करायची कोणात ताकद नव्हती. आम्ही त्यांच्या महोरक्याशी घासाघीस करून बघितली पण त्यापैकी कोणीच त्या दगडांमध्ये राहायला तयार नव्हता. “आम्ही मागे जाऊन चिडबासाला  मुक्काम करू आणि पहाटे परत येऊन पुढे रास्ता शोधू.”

या लोकांनी आपल्याला असेच वाऱ्यावर सोडले, तर मोहीमपुढे हळू शकणार नाही ही भीती सर्वांनाच होती, पण आमच्या हातात वाट बघण्याशिवाय काहीच नव्हते. 

पोर्टर परत निघाले आणि आम्ही एका प्रचंड शिळेखाली आश्रय घेतला. आमचे सर्व सामान दगडाच्या बाजूला रचले.आमची सगळी  टीम शिळेखाली सामावली. लहानपणी माझ्याकडे एक स्टोरीस अँड पिक्चर्स नावाचे एक पुस्तक होते , ज्यात एका मश्रुम खाली एक मुंगळा आसरा घेतो , पाउसातून वाचण्यासाठी. 

त्यानंतर अनेक छोटे प्राणी एकमेकांसाठी जागा करत जातात. मश्रूम  अजून मोठे होत जाते आणि सर्वांना सामावून घेते. ही  सोशियालिस्ट गोष्ट, अर्थातच, त्याकाळच्या रशियन पुस्तकातली. 

मात्री  मोहिमेत आणि नंतरच्या अनेक मोहिमांमध्ये या गोष्टीची आठवण व्हायची.  आयुष्यात पुढे देखील असे लक्षात आले की आपल्याकडे कितीही भरमसाठ सम्पत्ती असली तरी सुख मिळायला एक  छोटी चादर देखील पुरते. 

(मी लेफ्टिस्ट नाहीच, थोडा फार कॅपिटॅलिस्टच आहे.)

आनंदनी स्टोव्ह काढून खिचडी चढवली. चहा पिता पिता मगला हात शेकले . आमच्या गप्पागोष्टी रंगल्या. मामा परदेशींनी आयन रँड चा विषय काढला. फाऊंटन  हेड बद्दल चर्चा सुरु होती. मी काही हे पुस्तक वाचले नव्हते पण एका वेगळ्या आर्किटेक्टबद्दल ही कथा होती. आनंद आणि मामानी  हे पुस्तक वाचलेले असल्यामुळे ते दोघे चर्चेत रंगले होते. आम्ही मात्र सगळी ऐकीव पात्र असल्यामुळे गम्मत म्हणून ऐकत होतो. माझी मजल त्याकाळी ऍलिस्टर  मॅकलॅन , सिडने शेल्डन , फोरसिथ , अरविंग  वॉलेस  आणि रॉबर्ट लुडलूम पर्यंतच  मर्यादित होती. पुस्तकातील धाडशी लोकांमधून मिळणारी प्रेरणा मला जास्त आकर्षित  करीत असे. त्याकाळी वाचलेल्या बॉर्न आयडेंटिटी मधला बॉर्न, हा माझ्यासाठी एक आदर्श नायक होता. आपण देखील डोंगरामध्ये वावरताना , “बॉर्न” सारखे दक्ष असलो, तर वाईट परिस्थिती वर मात करू शकू असे माझे मत होते. नुकताच गिरीश आणि मी पुण्यातील निलायम  थिएटर मध्ये रॅम्बो  चा फर्स्ट ब्लड बघितला होता. असे वाटायचे की रेम्बो सारखेच आपण कुठून कड्यावरून घसरलो तरी धडपडत जगायचा प्रयत्न करत राहू. जख्मा झाल्या , हात पाय मोडले म्हणून काय झाले?  विसाव्या वर्षी आमचे  असे विचार असल्यामुळे भीती कमी व्हायची आणि फार विचार न करता पुढचे पाऊल  टाकायची तयारी असायची. 

क्रिस बोनिन्गटनचे सौथ वेस्ट फेस एवरेस्ट हे पुस्तक वाचून स्फूर्ती मिळायची. पण आमची मोहीम अल्पाइन पद्धतीची होती..आणि हे पुस्तक Siege  पद्धतीवर होते ( seige  म्हणजे अनेक पोर्टर , अनेक कॅम्प वापरून थोडा थोडा पर्वत जिंकायचा हा तर युद्धाचा खेळ! )  . हे पुस्तक आमच्यासाठी अगदी चुकीचे होते पण हे आनंदच्या आवडीचे पुस्तक होते. एव्हरेस्ट नॉर्थ इस्ट रिज हे मला आवडणारे पुस्तक. त्यातले माझे आवडते नायक, पिट बोर्डमन आणि जो टास्कर,  मोहिमेमध्येच नाहीसे होतात. लहान मोहिमे मध्ये यशाची गॅरंटी कमी असते. कधीकधी जीवावर बेतू शकते. साहसी खेळामध्ये अनिश्चितता असावीच लागते. 

मूठभर साहस आमच्या कक्षेत बसत नव्हते. जोखिमेची तयारी होती आणि मरायचा  विचार चुकूनही  मनात नव्हता येत. 

ऐन विशीत अँक्शन जास्त महत्वाची वाटते. त्यावेळी आम्हाला रांबो किती कळला हे जरा सिक्रेट आहे. ते थोडेसे रंगवायचा प्रयत्न करतो.

'भाऊ, हे व्हिएतनाम आणि अमेरिकेचे कसले युद्ध चालले काय कारण नाय समजले बुआ.' इती आमच्या पैकी एक.

'नई मंजे, तिकडे नॉर्थ व्हिएतनाम मधले कमुनिस्ट यांच्या विरुद्ध कारवाई केल्या सारखे वाटले. मंजे अमेरिका विरुद्ध कमुनिस्ट  लढा. '

एक शंका, ' पण मग त्यांचे पैसे अडकलेवते का तिकडे? रशियाची लुडबुड आहे का ती ?'

' असेल कदाचित. या जगा मधले कॉमुनिस्त लई waeet'. इति मी. (पाव शेर, ऐकीव आयन रेंड '' प्यायलेला).

'पण या सगळ्यात, त्या अमेरिकेतल्या शेरिफचे काय वाकडे केले होते रांबोने? ' हा प्रश्न मला पण पडला होता आणि आजवर उलगडला न्हाई.

 तरी रामभाऊ आमचा हिरोच! उद्याला गोर्ज क्रॉस करायची स्वप्न बघता बघता,आम्ही स्लीपिंग बॅग मध्ये घोरू लागलो. आमच्या वरची मोठी शीळा आम्हाला वरच्या रोकफॉल पासून संरक्षण देत होती






~~~ 


एक पाऊल पुढे, दोन पाऊले मागे 

रातभर त्या शिळेखाली झोपून पाठ अवघढली होती. नेमका कॅरीमॅट  खाली एक दगड होता ज्याने रात्र हराम केली. आम्ही सगळे अवघढलेल्या अवस्थेत झोपल्यामुळे कूस बदलायचीच सोय नव्हती.  चहाचे पातेले चढवून आम्ही पोर्टर लोकांची वाट बघत होतो. मात्री  नाल्याला पाणी कमी होते, पण सकाळी दगडांवर बर्फाचा बारीक थर असल्यामुळे थोडी दक्षता घ्यावी लागत होते. सॅक भरून आम्ही तयार होताच, हमाल पंचायत हजर झाली. साधारणपणे, पोर्टर  लोकांना रस्ता शोधण्याची सवय  असते पण या मधला कोणीच पुढाकार घेत नव्हता. मिलिंद  आणि माझा पारा चढला आणि आम्ही ठरवले की आपण यांनाही दाखवले पाहिजे की आपण काही कच्ची लिंबे नाही. मागून गिरीश ही सरसावला.


आम्ही विजार  गुढग्यापर्यंत वर सरकवली आणि थेट गुडघाभर पाण्यात शिरलो. पाण्याचा ओघ जोरात होता, पण आम्ही आईस एक्स टेकवत सरळ पाण्यातून प्रवाहा विरुद्ध चालू लागलो. मागून पोर्टर आमची मजा बघत बसले होते. काहींनी विड्या  शिलगावल्या होत्या. 


गॉर्ज  निमुळती होत गेली आणि पाणी आता चांगलेच जोरात वाहत होते. आम्ही पाण्याच्या प्रवाहा विरुद्ध प्रवास चालू ठेवला. आम्हाला  माहित होते की या लोकांपुढे आपण जर वाकलो, तर इथूनच परतावे लागेल. नाल्याच्या डाव्या काठावर एक छोटे मैदान होते आणि आम्ही त्यावर उड्या मारून चढलो. मागे वळून बघितले तर एक दोन पोर्टर  लाजे खातर पाण्यात उतरले होते. 


उजवीकडे, एक १०० फुटी कडा दिसत होता आणि त्यावर मात करणे सोपे होते पण दोर वापरावा लागला असता. . (बापूकाकानी रोप फिक्स करायला सांगितले, त्या ठिकाणी आम्ही पोचलो होतो.) मिलिंद आणि माझा अंदाज होता की थोडे पुढे जाऊन उजवीकडे थोडा सोपा चढाव असावा आणि आम्ही परत पाण्याच्या प्रवाहात उतरलो .  थोडा वेळ सरळ जाऊन मग डावीकडे चढाई केली. आम्ही गॉर्जच्या वर पोचलो होतो. पोर्टर आणि इतर गिर्यारोहक खूप वेळ लावत होते. बापूकाकानी सांगितलेला हा शेपर्ड कॅम्प असावा, कारण आम्हाला एक छोटे दगडांनी रचलेले किचन दिसले. हमाल टीम मधील सावकाश चालणाऱ्या लोकांच्या मागून चालत होते. त्यांना कसलीच घाई नव्हती. आपण जर वाट काढली नाही तर याना बेसकॅम्प पर्यंत खेचता येणार नाही हे आमच्या लक्षात आले. आम्ही पुढे चढू लागलो. वर , जिथे या नाल्याचा उगम  होता, ते ग्लॅशियर चे मुख दिसत होते. ४५ अंशाच्या दगडी स्लॅब वरून आम्ही चढत चढत ग्लॅशिअर गाठला . 

खाली बघितले तर हे मंडळी  अजून शेपर्ड कॅम्प पर्यंत देखील पोचली नव्हती. 


आम्ही अंगावर विंडचीटर  चढवून बसून राहिलो. बेस इथे लावला नाही तर ३-४ दिवस या सामानाची लोडफेरी आम्हालाच करायला लागणार होती. पोर्टर लोकांना वर खेचण्याशिवाय, काहीही पर्याय नव्हता. 


नजर फिरवताच शेपर्ड कॅम्पसाईट  खाली चिडबास जवळची भागीरथी दिसत होती. त्यापलीकडे, मंदा शिखर ऐटीत उभे होते. खाली गॉर्ज वरील छोट्या पठारावर काही तरी वादावादी चालू असल्याचे दिसले, त्यामुळे आमचे कुतुहूल वाढले.  कोणीतरी हाक मारून आम्हाला खाली बोलवत होते. त्यावरून अंदाज आला की आम्हाला जी भीती वाटत होती तेच झाले असावे. कॅम्प अपेक्षेपेक्षा खूपच खाली लागला होता.  मनातल्या मनात चडफडत आम्ही सावकाशीने खाली उतरू लागलो. तास दोन तास गेले असतील आम्हाला खालच्या कॅम्पवर पोचायला. मंडळी टेन्ट लावण्यात मग्न होती. आमच्या अल्पाइन पद्धतीच्या मोहिमेचे धज्जे उडाले होते आणि आता दिसत होते की आपली मोहीम फक्त एक शोध मोहीम ठरणार. 

Every chain is only as good as its weakest link.


 गिर्यारोहणात वा  कुठल्याही साहसी खेळात, कमी लोकांच्या टोळीमध्ये एकाच सर्वात प्रमुख गोष्ट म्हणजे सर्व लोकांचे मनोबळ  व कुवत सारखी असावी लागते. अथवा, प्रत्येक माणसाने स्वतः ची काळजी घेणे अपेक्क्षित  असते. कमी कुवतीच्या लोकांमुळे, इतर लोकांची पाहिजे तेवढी प्रगती होऊ शकत नाही. Birds of one feather, fly or flock together, हे कटू सत्य आहे.


कॅम्प इतका झाली लागायला आमच्याच टीम मधील दुर्बळ लोक जबाबदार होते. पोर्टर लोकांनी याच लोकांचा वापर करून स्वतः चे काम कमी केले. "तुम्ही लोक पटापट चढत नसल्यामुळे आम्हाला परतायला वेळ लागेल आणि नाल्याचे पाणी दुपारी फुगेल ", असा त्यांचा सूर होता.

या माझ्या दुसऱ्या मोहिमेत परत एकदा तोच प्रत्यय आला. अल्पाईन मोहिमेत या चुका अक्षम्य असतात. एका तोडीचे लोक मिळवणे आणि इतरांना नकार देणे हे सर्वांसाठी योग्य ठरते.


कॅम्प वर चूल पेटवून भाकऱ्या भाजणे चालू झाले. बटाट्याच्या रश्या मुळे माझा आली. नंतर गार पाण्यात भांडी घासायचे काम माझ्या वाटेला होतेच.





~~~ 

बेस कॅम्प 

पंधरा किलो ची प्रत्येकी एक फेरी, अश्या तीन फेऱ्या नंतर बेस कॅम्प स्थापित होणार. 45 अंशाच्या स्लॅब आणि एक रिवर क्रॉसिंग जाता येताना अशी हमाली सुरू झाली. ग्लेशियर च्या मुखापासून उजवीकडे एक छोटे मैदान होते. त्यामागे उत्तुंग कडा उभा होता मात्रि त्रिशूळ शिखर त्यामागे लपले होते. ग्लेशियरच्या उजव्या कडेला थेलू आणि सुदर्शन शिखराचा उत्तरेकडील हिमाछादित कडा. थेलू शिखर खालील कडा खडक व मुरुमाचा होता व त्याच्या उजव्या भुजेवर एका सुईसारखा सुळका, ज्याला थेलु नीडल असे म्हणत.

मैदानावर तीन टेन्ट जेमतेम मावतील, एवढीच जगा होती आणि शेजारी ग्लेशियर पाशी एक पाण्याचा झरा होता जो रात्री गोठायचा. पहिल्या फेरीमध्ये आम्ही चढायची सामुग्री, दुसऱ्या फेरीत खाण्याच्या गोष्टी आणि तिसऱ्या फेरीत तंबू असे वाहून आणले होते.

दगडाच्या स्लॅब वर सकाळी verglas (बर्फाचा थर) असल्यामुळे फार निसरडे होते.

माझा कॅमेरा रशियन झेनित मेकचा होता. तो माझ्या सॅकच्या वरच्या भागात असायचा. एकदा विश्रांतीसाठी एका स्लॅबवर  मी सॅक उतरवली असताना ती घसरली आणि कोलांट्या मारत 50 फूट फेकली गेली असावी. मागोमाग मीही धावत खाली उतरलो.

कॅमेरा बारा वाजले हे निश्चित कारण पहीली कोलांटी थेट सॅकच्या डोक्यावर पडला होती.

उघडून बघितले, तर कॅमेराला काहीच झाले नव्हते. या ठिकाणी जपानी कॅमेऱ्याचे बारा वाजले असते असे वाटते.  

तिसऱ्या लोड फेरीच्या दिवशी, बेसला पोचल्यावर लक्षात आले की आमच्या  खाद्य पदार्थांची बॅग फाडून कोणीतरी काही ऐवज गायब केला आहे. थोडी शोधाशोध केल्यावर लक्षात आले की दगडांच्या भेगांमध्ये काही मॉरमॉट आहेत. (उंदीर आणि खारीच्या मधला प्रकार.) तिसऱ्या दिवशी बेस कॅम्प लागल्यावर थोडे समाधान वाटत होते. या पुढे खऱ्या शोध मोहिमेची सुरवात होणार. बेस ग्लेशियर च्या वर असल्यामुळे, सूर्यास्त झाल्यावर थंड वारे  सुटत असे.

प्रत्येकाच्या लोडफेरीचे सामान वाटल्यावर आमचा प्रवास मात्री ग्लेशियर  वरून चालू झाला. उजवीकडे सुदर्शनचा नॉर्थ फेस हँगिंग ग्लॅशियर्सने लगडलेले होता. चतुर्भुज पर्वताच्या खाली पोचल्यावर आम्हाला डावीकडे वळायचे होते. ट्वीन शिखरांच्याखालून एक मोठा ग्लॅशियर  मात्री ग्लेशियरला येऊन मिळाला होता. ग्लेशीयर हा आईस फॉल  मध्ये रूपांतरीत होता आणि त्यावर चढणे अशक्य  होते. आम्ही ट्वीन च्या रिज खाली आलेलो होतो पण हा मार्ग चुकीचा वाटत होता. ग्लेशियर पलीकडे मात्री त्रिशूल नावाचे खडकाळ शिखर होते. आम्ही ग्लॅशियर वर पुढे चालत राहिलो. अतिशय खडकाळ चढ होता आणि माझे बूट पूर्णपणे फाटून गेले. चढ संपल्यावर एक छोटे मैदान लागले आणि तिथे कोणीतरी पूर्वीच्या काळी कॅम्प लावलेला होता असे लक्षात आले. एक रॉकेलचा कॅन  होता. कदाचित मिनु मेहतांच्या मोहिमेतील असावा. आम्ही अजून आगेकूच सुरु ठेवली. एका ग्लेशियरची बर्फ़ाळ जीभेशेजारी आम्ही सर्व सामान रचले. इथुन  मात्रीची एक शाखा दिसू लागली पण मात्रीचा कळस मात्र अजून लपलेलाच होता. समोर ग्लेशियर चा उंचवटा दिसत होता ज्यावर क्रिव्हासेस पसरल्या होत्या. आम्हाला इथे मार्ग काढायला वेळ लागेल असे दिसत होते. 

कॅम्प १ लागला. दुसऱ्या लोडफेरी नन्तर रंजना आणि मामा बेस ला राहणार होते. ते परतले.  

आम्ही पाच जण कॅम्प १ पुढे अल्पाइन पद्धतीने चढाई करणार होतो.  संध्याकाळच्या उन्हात आम्ही बुटावर crampon  चढवले आणि ग्लेशीयरवर थोडे फिरून त्याचे टेस्टिंग  केले. रात्री स्पिरिट स्टोव्ह काढून त्यावर रुरु चपाती आणि टोमॅटो सूप गरम करून खाल्ले. ( कॅलरी डेफिसिट डाएट हा कोणी आमच्याकडूनच शिकावा.)

सकाळी सहाच्या सुमारास आम्ही तंबू  गुंडाळून कॅम्प २ लावायच्या दृष्टीने बर्फावरून चालू लागलो. ग्लॅशियरच्या डाव्या बाजूला 'क्रेवास' होत्या. (क्रेवास  म्हणजे हिमनदीतील भेगा. हिमनदी जशी खाली वाहत जाते ती खालच्या जमिनीप्रमाणे सरकत जाते आणि ज्या ठिकाणी बर्फ मोडत जातो तिथे या “क्रेव्हस” भेगा  पडतात.) काही इतक्या खोल होत्या की तळ दिसतच नव्हता. उजवीकडून आम्हाला मार्ग मिळाला पण उजव्या कड्यावरून बंदुकीच्या गोळ्यासारखे दगड सुटत होते. शेवटी ग्लॅशियर  च्या सुरवातीपर्यंत आम्ही पोचलो. मात्रीचा उजवा खांदा दिसत होता आणि आमच्या उजवीकडे एक दगडी कडा होता ज्यावर एक “hump” दिसत होता. या दगडी खांद्याच्या पलीकडे छोटा icefall होता जो उजवीकडे मात्री च्या कड्यापर्यंत जात असावा. हेम्या, आनंद आणि मिलिंद मोठ्या तंबूत होते. गिरीश व मी छोट्या तंबूत होतो. पुढचा दिवशी काय नवीन उलगडेल याची आम्हाला उत्सुकता लागून राहिली होती. 










~~~ 

हवामान बिघडले. ‘Bivoac’ (उघड्यावरचा तळ) !


कॅम्प २ वरून सकाळी निघायला उशीर झाला. तम्बू खालून बर्फाळला होता  आणि वरील “हम्प” मुळे  सूर्यप्रकाश येत नव्हता. रात्री आमच्या तंबूने बर्याच दगडी “गोळ्या” चुकवल्याचे आमच्या लक्षात आले. वरच्या हम्प खालच्या दगडी भिंतीतून वर्षाव चालूच होता. स्पिरिट स्टोव्ह वर चहा गरम झाला. माझ्या सॅकमधून मी मिठाई काढून सर्वांना वाटली. गुळाच्या पोळ्या आणि साटोर्या याना मढीवाले बामचा वास लागला होता. त्यामुळे विक्स लावलेल्या गूळपोळ्या खाल्ल्यासारखे गार गार वाटत होते. (बामच्या बाटलीचे झाकण कुठेतरी गायब होते.) 

मात्रीचा समोरील कडा खडकाळ होता आणि आमच्या अंदाजाने उजवीकडील कडा कदाचित जास्त सोपा असेल असे वाटत होते. आम्ही एकमेकाला रोप बांधला आणि सावकाशीने उजव्या चढाच्या दिशेने चालू लागलो. 

तासभर साधारण ४५ अंशाचा चढ चढून वर आलो तर मात्रीच्या उभ्या कड्याचे आम्हास दर्शन झाले. गिरीश थकलेला होता त्यामुळे त्याला आम्ही पुढे ठेवले आणि त्याच्या वेगाने आम्ही चढ़ाई सुरु ठेवली.  आता आमच्या कॅम्प २च्या वरचा ‘हम्प’, आमच्या उजवीकडे होता आणि तो मात्रीच्या उजव्या  कड्याचाच (वेस्ट फेसचा ) एक भाग असल्याचे आमच्या लक्षात आले. 

दुपारी दोनच्या पुढे हवामान अचानक बदलले. आम्ही फेस वर असताना खालून अचानक पांढरे ढग भरू लागले आणि खालची दरी ढगानी भरून गेली. आता आमच्या सर्वत्र सगळेच पांढरे दिसू लागले.. (मात्रीच्या डावीकडच्या कड्यावरचा काही दगडी भाग सोडून.)  आम्ही कड्याच्या खालच्या भागात असल्यामुळे ४५ -५० डिग्रीवर टेन्ट लावणे शक्य नव्हते. आणि कड्यावरून हिमकडा कोसळला असता तर आम्ही त्याच्या सरळ रेषेत होतो. हा भाग आम्हाला लवकरात लवकर पार करायचा होता,  पण वर काही टेन्ट साठी सपाटी मिळेल याचीही शाश्वती नव्हती. वाईट हवामानात आम्हाला काहीही धोका पत्करायचा नव्हता. 

इतक्यात आमच्या लक्षात आले की आमच्या उजवीकडचा कडा  आणि ग्लेशियर या मध्ये एक पोकळी तयार झाली होती. याला ‘बर्गशृंड’ असे म्हणतात. बर्फातील भेगेचाच प्रकार  (crevasse), पण हा ग्लॅशियर आणि डोंगर जिथे मिळतात तिथे सापडतो. 

आनंद आणि मी उजवीकडे चढून ‘बर्गशृंड’ ची टेहळणी केली. आम्हाला आत झोपता येईल एवढी जागा होती आणि वरून हिमकडा कोसळलाच तरी आमच्यावर थोडा बर्फ उडण्यापलीकडे फारसे नुकसान झाले नसते. 

जागा लहान होती आणि तंबू लावणे शक्य नव्हते. वर बघितले तर हम्पच्या वरून आमच्या डोक्यावर एक बर्फ़ाळ झुंबर लटकत होते. (sword  of damocles असे टोपणनाव आम्ही त्याला बहाल केले.)  झुम्बरातील एक एक बर्फाचा “सुळका” अतिशय तीक्ष्ण धारेचा होता. जणू पाणी ठिबकून धार कमावलेला सुराच. आईस एक्सनी  आम्ही तो सुरा थोडाफार तोडायचा प्रयत्न केला, पण फारसा उपयोग झाला नाही, कारण आमची उंची कमी पडत होती. दिवसभराच्या परिश्रमामुळे आम्ही थकून गेलो आणि झुंबराकडे दुर्लक्ष करायचे ठरवले. 

स्पिरिट स्टोव्हचा भूर भूर चालू होता आणि आम्ही ब्रूकबॉन्ड चहाची मजा घेणार होतो. 

आम्ही या शिखरावर अशा ठिकाणी आलो होतो जिथे आतापर्यंत कोणी माणसांनी पाय ठेवलेला नव्हता. तपमान साधारण ० सेल्शियस होते, जे परिसराच्या मानाने जरा गरमच होते. आम्ही वाचलेल्या पर्वतारोहणावरील पुस्तकातील अनुभव आता आम्ही प्रत्यक्ष घेत होतो. एव्हरेस्ट नॉर्थ रिज मध्ये, बोर्डमन -टास्कर जोडीने खणलेलया बर्फामधल्या गुहा आठवल्या. इथे आम्हाला तर आयतीच  गुहा मिळाली होती. आमच्या गुहेची उंची समुद्र पातळीपासून १७००० फूट असावी. आमच्यात आणि परदेशी गिर्यारोहकांमधला महत्वाचा फरक म्हणजे आमच्या अंगावरची वस्त्रे. एक लांब बाह्यांचा टी-शर्ट. त्यावर खाकी  कॉट्सवूल शर्ट. एक आर्मी स्वेटर आणि त्यावर एक पातळ विंड चिटर . मिलिंदनी तर रेनकोटचा टॉप घातला होता.  खाली एक कॉटनची  लॉन्ग जॉन आणि त्यावर ट्रॅक सूट ची विजार. आमचे खाणे देखील रुरु चपाती आणि टोमॅटो सूपपर्यंतच  मर्यादित होते, त्यामुळे थंडीपासून बचाव करणे कठीणच होते. अर्थात, या सर्व गोष्टींपेक्षा आम्हाला महत्वाची वाटणारी गोष्ट म्हणजे आम्ही स्वकर्तुत्वाच्या जोरावर, इथवर पोचलो होतो. 

हेम्या डोकं दुखत असल्याची तक्रार वारंवार करत होता. आनंदनी त्याच्या सॅक मधून हुडकून डोकेदुखीची गोळी त्याला दिली तर आमच्या  “शेरखान” नी  ती गोळी  फेकून दिली आणि म्हटला “या असल्या गोळ्यानी  काही फरक नाही पडत.” मी विचार करत होतो, “अरे बेट्या. तक्रार तरी कशाला केलीस. एक गोळी वाया गेली ना!” (हेम्यानी अजून स्वेटरही  घातला नव्हता. ) गाठलेल्या उंचीबरोबर  प्रत्येकाच्या वागण्यातील विचित्रपणा देखील वाढत चालला होताच. माझा खोकला कॅम्प २ पासून चालूच होता. त्याला टीबी खोकला असे नाव देण्यात आले. खोकल्याबरोबर डोके दुखीने  माझ्या तिरसटपणात भर घातली होती. 

संध्याकाळ ४ वाजताच झाली. त्याबरोबर हिमवर्षाव सुरु झाला. त्यापासून वाचण्यासाठी आम्ही वरून टेन्टचे कव्हर पांघरून घेतले. आतून ब्रँडी ची बाटली काढून प्रत्येकानी गरम पाण्यात ब्रँडीचे एक एक बूच घेतले. थोडी थंडी  पळाल्यासारखी वाटली.  उजेडासाठी ग्लासमध्ये एक मेणबत्ती पेटवून ठेवली. खायला रुरु चपाती आणि सूप होतेच. 

टेन्टचे कव्हर ओढून घेतल्यामुळे एक फायदा झाला. वरचे काटेरी झुंबर दृष्टी आड गेले. बाहेर चंद्राच्या निळ्या प्रकशात वरचा कडा  चमकत होता. तारे अतिशय स्पष्ट दिसत होते आणि अकाश गंगा ही स्पष्टपणे चकाकत होती.  

आम्ही, चढाईसाठी काहीतरी वाट सापडेल, अशी आशा  बाळगून होतो. सर्व देवाच्या हातात सोपवून आम्ही झोपी गेलो.











~~~ 



मोठे Bergshrund आणि ज्ञानी Ridge
बिवोक च्या कपारीत चहा, साटोर्या , गूळ पोळी आणि लक्ष्मी नारायण चिवडा असा नाश्ता केला. आजचा दिवस आमच्या साठी अतिशय महत्वाचा होता. आमच्या वरील टांगते ग्लेशीयर चुकवून फेस वर मार्ग शोधायचा होता. आवराआवर करून आम्ही मार्गी लागलो. क्रॅम्पॉनचा (बुटातील खिळे) बर्फातील करामक्रुम आवाज ..दर दहा स्टेप नंतर आइस एक्सने बुटाच्यावर वार करून बुटाखली जमलेला बर्फाचा गोळा काढायचा, असा क्रम अंगवळणी लागला होता. आमच्यापुढचा कडा आणि खालचे basin या मध्ये १० फूट उंची चे Bergshrund होते. हे चढायला आमच्याकडे Ladder नव्हती.
मी या बर्फातील भेगेच्या कमीत कमी उंचीच्या “Bridge “ च्या शोधात अजून उजवीकडे चढत गेलो.
आता, मी हम्पच्या वर पोचलो होतो. समोरची बर्फातील भेग निमुळती होऊन एका माणसाच्या उंची एवढी झाली. तिथे सर्व जण जमलो. आता समोरील फेस चढणे घातक नव्हते, कारण हँगिंग ग्लेशियर आता डावीकडे होता. त्यातील तुकडे पडून जरी avalanche झाला तरी तो आमच्या वाटेत येणार नव्हता. मी आइस हॅमर घेऊन बर्फावर वार केला तर माझ्यावर बर्फाच्या ठिकऱ्यांचा खच उडाला. बर्फ अतिशय ठिसूळ होता आणि हा भाग म्हणजे जणू बर्फाचे झुंबरासारखे विणलेले जाळे आहे असे वाटत होते. बरीच तोडफोड करून देखील कठीण बर्फ लागेना. मी पण लटकून - लटकून थकलो होतो. थेलू शिखर आता आमच्याच उंचीला दिसत होते. १९००० फुटावर थकवा पटकन येत होता.
Bergshrund चे उजवीकडील टोक हम्पच्या पलीकडे वळले होते आणि पलीकडचे काहीच दिसत नव्हते. गिरीश आता पुढे सरसावला. त्याला Belay देत मी बर्फात स्वतः अँकर केले होते. ज्ञानी रिजच्या वर काहीतरी करून मात केली पाहिजे आणि त्यानंतर मार्ग थोडा सोपा होईल यावर सर्वांचे एकमत होते. गिरीश रिज ओलांडून पलीकडे गेला तर समोर मोठा फेस होता जो सरळ खाली ग्लॅशियर पर्यंत उतरत होता. या फेस वर रोप लावायचे ठरले. आमच्या कडे केवळ ५०० फूट रोप होता.
हम्प वर कॅम्प लावावा लागणार हे नक्की होते कारण अजून ५०० फुटावर, फेस वर जेमतेम उभे राहायला जागा दिसत होती ते पण स्वतःला अडकवून घेतले ,तरच.


वाद-विवाद आणि भडका !
गिरीश परतल्यावर, आम्ही टेन्ट लावायचा विचार करू लागलो. आनंदचा टेन्ट मध्ये राहायला विरोध होता. हंप वर बर्फामध्ये एक मोठी क्रिव्हास होती आणि त्याच्या मते त्या क्रिव्हास मध्ये रात्र काढणे सोपे गेले असते. मला अजिबात अशा ठिकाणी अजून एक रात्र काढायची इच्छा नव्हती. मी वाद घालून पटवायचा बराच प्रयत्न केला पण तो काही त्याच्या निर्णयावरून डगमगेना. आमच्यात शाब्दिक चकमक चालू झाली.
तो त्याच्या ठिकाणी कदाचित बरोबरही असेल पण या उंचीवर चकमक अकारण वाढत गेली होती.
“मी तीन एक्सपेडिशन केल्या आहेत आणि तुला काहीच अनुभव नाही.” तो म्हणत होता त्यात थोडेफार तथ्य होते.
शेवटी आपले मत खरे ठरवून, त्याने मला क्रिव्हास मध्ये घुसण्यास सांगितले.
मी नाराजीने दोर कमरेला लावून आत शिरलो तर ती क्रिव्हास खालून अतिशय भुसभुशीत होती. मी थेट कमरेपर्यंत बर्फात घुसलो. तिथून क्रिव्हास अजून तिरकी घुसली होती आणि त्याचा तळ दिसत नव्हता. मागील रात्री सारखा बिवोक अशक्य होता कारण बर्फ तुडवताना क्रिव्हास च्या पाय खालची जमीन सरकली तर Rescue मोहीमच करावी लागली असती.
मी बाहेर परतल्यावर आनंद परत काहीतरी मनाला लागेल असे बोलून गेला. माझाही पारा चढला. मला एक्सपीडीशन सोडून घरी परतावेसे वाटू लागले. गिरीश नेहेमीप्रमाणे मला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याने मला शांत राहायचा सल्ला दिला. बर्फात फावडे मारून बर्फाचे ब्लॉक कापून आम्ही तंबूसाठी जागा केली.
आनंद, मिलिंद आणि हेम्या एका तंबूत तर गिरीश आणि मी दुसर्यात. तंबू क्रिव्हास च्या रेषेतच होते. संध्याकाळ झाली आणि मंदा पर्वतामागील आकाश लाल भडक दिसू लागले जसे काही आकाशाला आग लागली आहे. कदाचित, माझ्या मनामधील रागानेच जणू हे आकाश पेटवले असावे.
तंबूमध्ये आम्ही दोघेच असल्यामुळे, स्वयंपाकाची जबाबदारी आमच्यावर आली होती.


आमच्या दोघांची मैत्री जुनी होती व असे बर्याचवेळी तो मोठ्या भावासारखा मला समजून घेऊन, अतिशय काळजीपूर्वकरित्या परिस्थितीची जाणीव मला करून देत असत. या वेळीही, मी माझ्या भावना व्यक्त करून, त्याला माझी बाजू सांगितली. सुळक्यावर गिरीश आणि मी हे अनुभवले होते. खडा पारशी ला एका लाईनीत पाच लोक लटकलेले सारखे आठवत होते. ५०० फुटी रोप वर आम्ही ५ जण लटकल्यावर काय परिस्थिती येईल, हे दिसत होते.
त्यात माझे आणि आनंद चे बिनसले होते आणि त्याच्या बरोबर पुढे जायची मला अजिबात जायची इच्छा नव्हती. अजून एक खटका उडाला तर परिस्थिती अजून वाईट होईल, असे वाटत होते.
स्पिरिट स्टोव्ह तंबू बाहेर ठेवता येत नव्हता, कारण वाऱ्याने सारखा विजायचा. तम्बूच्या आत, आधीच ऑक्सिजन दुर्मिळ, त्यात स्पिरिटच्या धुराने छातीत जळजळणे चालू झाले. त्यावर बर्फ वितळवून गिट्स टोमॅटो सूप आणि रुरु चापतीने अजून वैताग आणला होता. संध्याकाळच्या जेवणाच्या वेळी मला बरे नसल्याचे मी जाहीर केले. आनंदचा ने देखील फार आग्रह केला नाही.


सकाळी झाली आणि आम्हाला कुणा जनावराचे पंजे दिसले . ते शेजारच्या क्रिव्हास मध्ये उतरले होते, जिथे आनंदच बिवोक करायचा अट्टाहास होता. पंज्याच्या अंतरावरून वरून तो स्नो लेपर्ड असावा असे वाटते.
मिलिंद ने रोप फिक्स करायला घेतला. ५०० फुटावर उजवीकडे एक खडकाळ भागात त्याला रॉक पिटॉन लावायला जागा मिळाली. आनंद आणि हेमंत त्याच्या पाठी belay देत होते. मी आता, चढाईमधून अंग काढून घेतले होते. मिलिंद खाली आल्यावर आम्ही चहा तयार ठेवला होता.


आनंदनी चेष्टेच्या स्वरात मला म्हटले, “ जरा जाऊन रोप कसा लावला आहे , बघून तरी ये.”
त्याने खरीच चेष्टा केली की मी उखडलेला असल्यामुळे मला वाटली, हा एक भाग, पण मी प्रत्युत्तर म्हणून हार्नेस लावली आणि एक जुमार घेऊन सरळ चढत चढत रोपवरून वरील दगडापर्यंत जाऊन पोचलो. मला Belay नव्हता. (त्याकाळी जुमारिंग करताना आम्ही कधीच Belay वापरात नसू.)
वर बघितले, तर एकही टप्पा असा नव्हता, जिथे बिवोक करता येईल, किंवा तंबू लावता येईल.
वर ६०-७० डिग्री चा कडा होता आणि खाली बघितले तर सरळ ग्लॅशियर मधील मोठाल्या क्रेवास आता बारिक- बारीक दिसत होत्या. खाली आल्यावर, मी उत्कृष्ट रोप फिक्स केल्या बद्दल मिलिंदचे अभिनंदन केले.
“मात्री चढणे अशक्य आहे असे मला वाटते पण, आपण height gain करून अजून किती वर पर्यंत जाऊ शकतो, हे तुम्ही तिघे दाखवू शकता. आतापर्यंत, इथवरही कोणी पोचलेले नाही. थेलू पर्वत मला खाली दिसत होता, म्हणजे आपण २०,००० फुटापर्यंत मजल मारली, असा माझा अंदाज आहे. अजून २००० फूट चढाई आणि १-२ km traverse बाकी आहे ” असे मी म्हणालो.


मग मी जाहीर केले,” मी खाली जायचा निर्णय घेतला आहे. इथे बसून माझा फारसा उपयोग नाही आणि माझ्या मुळे फ्युएल आणि शिधा अजून कमी होणार. इतक्या लहान रोप वर ५ जण जरा जास्तीच होतील असे वाटते. “
गिरीश ने देखील मला दुजोरा देत खाली यायचा निर्णय घेतला. मनातल्या मनात मात्र मला मिलिंदला अडकवल्याबद्दल खेद वाटत होता. मिलिंद, गिरीश आणि मी एका रोप वर असतो, तर आमचे एका लेवलचे होतो.
सद्यावस्थेत, माझ्या खांद्यावर इतर लोकांचे भार मला नको होता. खडा पारशीच्या अनुभवाने मी खूप शिकलो होतो. मुख्य म्हणजे आनंद बरोबर अजून थोडा ही वेळ घालवला, तर आमच्या मैत्रीत कायमची वितुष्टि येईल, असे मला वाटत होते.

२०००० फुटांवरून माघार !

तिसऱ्या दिवशी सकाळीच आमचा तम्बू पॅक करून, आम्ही दोघे खाली उतरू लागलो. बरोबर न लागणारे सामान घेतले होते. आज ते तिघे height gain करून परत कॅम्पवर येणार होते .
गिरीश व मी ग्लॅशियर वर पोचलो. वरून या तिघांचे आवाज खाल पर्यंत पोचत होते. हेम्या बहुतेक दमलेला होता आणि आनंद त्याला पाय जोरात मारायला सांगत होता. अर्थात, आनंदचे काहीच चूकत नव्हते. मरगळलेल्या अवस्थेतला गिर्यारोहक हा रोप मधील इतर लोकांसाठी एक जोखीमच.
ग्लॅशियर मधून येताना, आम्ही जरा ग्लॅशियरच्या उजव्याबाजूनेच उतरत होतो, कारण हा भाग आम्ही बघितला नव्हता. इतक्यात, मला बर्फात एक लाल फेदर कॅप दिसली आणि मी उत्साहाने ती उचलायला गेलो. पण मला त्या पूर्वीच्या बंगाली मोहिमेतील एक मृत गिर्यारोहक आठवला. आणि वेडे वाकडे विचार मनात आले आणि मी धजावलो नाही. आमचे तिघांचे सुखरूप खाली येणे आता अजून जास्त महत्वाचे होते.
आम्ही बेस कॅम्पवर पोचलो. मामा परदेशी आणि रंजना कथा ऐकण्यास उत्सुक होते. आम्ही दोघांनी त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. रात्री स्वस्थ झोप लागली नाही, कारण तिघांची अवस्था काय असेल हे कळत नव्हते.
सकाळी गिरीश , रंजना आणि मी कॅम्प १ ला निघालो. कॅम्प २ ते कॅम्प 1 च्या ग्लॅशियर मध्ये आम्हाला तीन ठिपके खाली येताना दिसले. आम्ही त्यांना भेटायला ग्लॅशियर टंग च्या टोकाला गेलो.
आनंद म्हणाला, " रोपच्या शेवटापर्यंत पोचायला आम्हाला बराच वेळ लागला. खालचा रोप आता वर सरकवायचा होता पण संध्याकाळ होत आली होती. त्यामुळे आम्ही तिथूनच परत यायचा निर्णय घेतला.” मला तो निर्णय योग्य वाटला.
सगळे खाली सुखरूप पोचल्यामुळे आम्हाला हायसे वाटत होते. २०००० फूट पर्यंत अपदाक्रांत शिखरावर मजल , ती देखील Alpine Style , नवीन रूट वर.. हे सगळे जगाला कळले नाही, तरी आमच्या दृष्टीने वाखाणण्यासारखी कामगिरी होती. कॅम्प मध्ये आता मूग डाळ खिचडी खायला मिळाली, ही देखील आमच्या साठी मेजवानीच होती.
समोर मंदा शिखरामागे सूर्यास्त होत होता. आता आकाश लाल भडक नव्हते.
आनंद व मिलिंद पोर्टरना बोलाविण्यास खाली जायला निघणार होते.
पोर्टरांसोबत खाली जाताना ४५ डिग्री च्या स्लॅब ,शेफर्ड कॅम्प, मात्री गॉर्ज आणि तो फुगलेला मात्री नाला, हे सगळे आता पूर्वीपेक्षा सोपे वाटत होते.


३ मार्च २०२३
मात्री मोहीम किती जोखीमीची होती, याचा प्रत्यय पुढील आयुष्यात आला. वयोमानानुसार, येणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे आणि वाढत्या कुटुंबाच्या दृष्टीने मी सुरक्षिततेबद्दल खूप जास्त विचार करू लागलो.
रॉकफालच्या क्षेत्रात हेल्मेट घालणे उचित होते. आमचे डाएट हे उपासमारीचे होते. अंगावरील वस्त्रे ही सह्याद्रीतच ठीक होती. गोरेटेक्स चे ओव्हरऑल, कोफ्लाच बूट अत्यावश्यक होते. आम्हाला किमान १५००फूट तरी रोप लागला असता. त्रिकोणि तंबू ऐवजी डोम टेन्ट आवश्यक होते. Walkie talkie ची नितांत गरज होती. कॅम्प ३ वर कुठलाही अपघात झाला असता तरी गंगोत्री ला यायला ४ दिवस लागले असते. महिन्याभरात आमच्या देशी आइस हॅमर चे वेल्डिंग तुटले.
काही वर्षांनंतर मला थेलू शिखर चढायचा योग आला. मात्री शिखराच्या फोटोच्या शोधात आम्ही जंग जंग पछाडले होते. थेलू वरून मात्री चा पूर्ण विस्तार दिसत होता. आनंदनी थेलू आधीच चढले होते आणि असा फोटो त्याच्या संग्रही असायला पाहिजे होता.
अर्थात हे सगळे असूनही, दैवलिखित कोणी टाळू शकत नाही, हे पुढे अतिशय अवघडरित्या समजणार होते.
अजून आठवते आनंदचे ओरडणे, “हेम्या, क्रॅम्पॉन जोरात मार.” कुठल्यातरी दुसऱ्याच एक्स्पिडिशन मध्ये.. वेगळ्याच पर्वतावर, वेगळ्याच गिर्यारोहकामुळे झालेला प्रसंग आठवतो आणि ..
एक हुंदका गळ्याशी येतो आणि लक्षात येते. हीच वेळ असते माघार घ्यायची.
जग काहीही म्हणो;
The prime responsibility of a mountaineer is to be back, safe and sound.
:समाप्त :











No comments:

Post a Comment