archives विभाग अथवा रेकॉर्ड्स (आणि त्यात मळलेली माणसे )
प्रशिक्षणार्थी म्हणून design ऑफिस मध्ये काम करत असताना एक आठवड्यासाठी माझी नेमणूक तिथल्या रेकॉर्ड्स ठेवणाऱ्या विभागात झाली. कोणी कर्मचारी सुट्टीवर गेला असल्यामुळे आणि काही परदेशी drawing वर नंबर टाकायचे (बिनडोक) काम करायला मी तिथे जाऊन बसलो. माझा कागदाशी संबंध नेहेमीचा. design करत असताना कोरा tracing paper, एकही चुणी नसलेला, निवडायचो. मला कागदावर बारीक डागही खप नसे. records मधील काही दिवस घालवल्यावर मला हे बारकावे सह्य वाटू लागले.
records म्हणजे जुन्या आणि नवीन designs चे ग्रंथालयच. Drawing ची नवीनता चुरगळण्याचा वा मळवण्याचा चा पाहिला हक्क हा records चा. अमोनिया प्रिंट काढताना जर प्रिंटर चा मूड खराब असेल तर drawing चे बारा वाजलेच म्हणून समजायचे. मग सिल्लो टेप लावून ठिगळे जोडताना एक गोष्ट शिकावी. 'धीर धरा. आपले कुणाकडे काम असेल तर साहेबी मिजास बाजूला ठेवा. त्याने बरेचसे प्रष्ण उद्भवत नाहीत.' पण जर तुम्ही आपला हेका कायम धरला तर मशीन मध्ये कागद चिकटू शकतो. प्रिंट मशीन तापलेले असले तर फिल्म drawing आतील ड्रम ला चिकटून फिरत राहते आणि drawing चे धिंडवडे...इत्यादी व्यथा. यातून मला शिकण्यासारखे बरेच होते. पहिले म्हणजे drawing काढताना कागद मळलेला अथवा चुण्या पडलेला असला तर काही फरक पडत नाही.
रेकॉर्ड्स मधील काही आरेखने, माझ्या जन्माच्या पूर्वीची. बरेचसे आरेखक, कधीच निवृत्त झाले असावे. काही चित्रे जर्मनीमधून आलेली. माझ्या बस्त्यात हिताची कंपनी च्या प्रेस ची आरेखने. काम केवळ रजिस्टर मधून नवीन नंबर घेऊन drawing वर टाकणे.तसे काम सरळ आणि सोपे. मी कामावर शिकत असल्यामुळे, मी drawing नजरे खालून घालायचो. जपानी लोकांनी काढलेली ही चित्रे बघून आश्चर्य वाटले. कोठेही कोरीवपणा नव्हता. चित्रात छेद असेल तर त्या दाखवणाऱ्या रेषा नव्हत्या. अक्षर बेताचेच. (कॉम्पुटर च्या पूर्वीचा काळ.) आमच्या मास्तरांनी असे drawing फाडले असते आणि 'कुणा ' गाढवाचा आणि त्याच्या खानदानाचा उल्लेख मांडून असे drawing प्रिंटींग मशीन मध्ये अडकून फाटले तर जगाचे कसे बरे होईल ही गाथा ऐकावी लागली असती. मास्तरांच्या बोलण्याच्या पलीकडच्या जगात, मी सुखात नांदत असल्यामुळे, या सगळ्यातून मी एकच गोष्ट शिकलो. चित्र कमी वेळात बनवली असली, तरी अचूक असावी. विचाराची मांडणी महत्वाची. चित्र वर्क शॉप मधील कामगाराला कळले की काम फत्ते. चित्राची सुरेख मांडणी काय कामाची? हिताची ..जपानमधील एक प्रगत कंपनी हे मला शिकवून गेली, एक ‘फालतू’ काम करताना आणि माझ्या कामाचा वेग वाढण्यास मदत झाली. records च्या या छोट्या कोपऱ्यात मी अम्मोनिया प्रिंट काढायला (आणि वाळवायला ) शिकलो.
“अहो. भालजी पेंढारकरांचे आपण कोण?” मी tracing मधून डोके उचलून बघितले तर नामदेव. नेहेमीचा प्रष्ण. मी हसून म्हणालो, “आडनाव बंधू.” नामदेवांचे केस records च्या अमोनियाने पिकले होते. प्रिंट काढायचे छोटे अमोनिया प्रिंट मशीन याच विभागात होते. मोठ्या कागदाचे प्रिंट दुसऱ्या विभागात. दर दिवशी सकाळी नामदेवांची एक फेरी मोठ्या प्रिंट काढण्याच्या विभागात. संध्याकाळी अजून एक फेरी.
“चला पेंढारकर. मी तुमची ओळख करून देतो तिकडच्या लोकांशी.” नामदेवांचा हेतू मला गुंतविण्याचा होता हे न कळण्या इतका मी बाळू नव्हतो. वयानी लहान असल्यामुळे, ऐकून घ्यायची सवय. उगाच कोण वयस्कर माणसाच्या वाकड्यात का जावे? या आदराला ‘काही मंडळी’ हक्काची समजतात आणि आदर देणाऱ्याला “शहाणा” ठरवतात. न देणाऱ्याला अथवा वाकड्यात शिरणार्याला “उद्दट”.
पलीकडच्या मोठ्या प्रिंट रूम मध्ये वातावरण वेगळे. सर्व प्रोडक्षनला चित्र छापून पाठविणारं केंद्र. मोठी अमोनिया यंत्रे. मेंदू ला झिणझिण्या आणणारा वास, आणि त्याच वासा मुळे, (कदाचित) , झालेली अत्यंत उर्मट माणसे. कोण मित्राने सांगितले कि हे सर्व मिलिटरी मधून निवृत्त झालेले सैनिक. अशा या युद्धभूमीत मी उभा होतो drawings चे भेंडोळे (मशीन गन सारखे) काखेत धरून.
मला बघून एक जण खेकसला, “ह्ये काय घून आला. इथे आम्हाला खाजवायला वेळ नाही आणि वर हे.” मी "काय" भोवती विचार करत असतानाच नामदेवांनी ओळख करून दिली. “अहो हे पेंढारकर. आमच्या कडे ट्रेनिंग घेत आहेत. उद्या पासून काही दिवस हेच येणार.” माझ्या हिरव्या डगल्या कडे बघून दगडू म्हणाले, “ एप्रेन्तीश का?” त्या नंतर एक कुत्सित नजर टाकली. “हे एप्रेन्तीश.. सगळे कंपनी चे जावई. आम्ही ओळखून आहे!”
मी म्हणालो, “ जरा हे urgent पाहिजे.” दगडू खेकसला, “ मग काढा कि स्वतः.”
(तेव्हां पासून पुढील १४ वर्षे “urgent” प्रिंट मी स्वतः काढत होतो.)
design ऑफिस बदलले. तिथे वेगळे रेकॉर्ड्स. परत तिथल्या माणसांशी ही जुळवून घेतलं. प्रिंट रूम मध्ये परत सर्व मंडळी निवृत्त सैनिक. माझा जुना मित्र त्याच विभागात काम करत होता आणि त्यामुळे ओळख पटकन झाली. प्रवीण आणि मी एकाच batch मधले. प्रिंटींग रूम मधील वातावरण तापलेले असले की तो देईल तो सल्ला मी ऐकायचो.
प्रवीण, “ हे की खरे लढवय्ये नाहीत. स्वतः क च्या चुकीमुळे handicap झालेले आहेत.” मग प्रवीण एक-एक कथा रंगवून सांगायचा. (सत्य घटनेवर आधारित.)
“हा दगुड! कसा सफारी घालून खेकसत आहे. पायाने लंगडतो. युद्धाच्या वेळी टेहळणी करत होता. बघत एकीकडे होता आणि गोळी दुसरीकडून अली. शत्रूकडे लक्ष नाही. नक्की तंबाखू चोळत असणार.”
दगडू कडे बघितले आणि प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. ‘पोप आय’ सारखा वाकडे तोंड. खाचाच्या आत बारीक डोळे. कपाळावर गंध आणि त्यावर गांधी टोपी. गळ्यात सोनेरी चेन . कुणी काळी गावच पैलवान असावा. आता ढेरी सूटलेली. ढेरी सफारीच्या बटनांवर भार देऊन बाहेर डोकावायचा प्रयत्न करीत. फेंगडे पाय वरचे शरीर जेमतेम पेलवणारे. या माणसाकडे “urgent” काम घेऊन जायची माझी बिशाद नाही.
“दगडू च्या वेषावरून जाऊ नकोस. दोन बायका आहेत त्याला. सरकारने दिलेली जमीन . तसा गडगंज आहे.बुलेट वरून येतो. सरकारी पेंशन आणि इथला पगार..”
दगडू कितीही निष्ठुर वाटत असला, तरी स्वभावाने भोळसर. लोकांनी त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून union च्या निवडणुकीत उभा केला. बिचारा.. कधी नव्हे तो मत मागण्यासाठी विनम्रपणे बस उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्याला नमस्कार करून (कधी नव्हे ते) स्मित चेहेऱ्यावर पसरून मान वाकडी करून विनवण्या करत होता. निकाल लागायच्या आधी, त्याच्या “हित चिंताकांनी “ एक पार्टी देखील करून घेतली.
दुसऱ्या दिवशी Deposit जप्त झाल्यावर, records मध्ये “urgent” प्रिंट मागणे “मंजे अत्म्हात्या” करण्यासारखेच. प्रिंट रूम चे दार बंद.
“रेकिशन (requisition) आणि भेंडोळी खिडकीत ठेवा आणि तडीक निघा. इथे तुमच्याहून urgent काम पडलाय.” प्रिंटींग रूम मध्ये इमरजेनसी लागू झाली.
दगुड चा कार्यकाल त्यापुढे फार दिवस टिकला नाही. कुणीतरी यास सांगितले की अमुक तमुक अविवाहित स्त्री मांगलिक आहे. दगुड नी तिची गाठ घातली आणि म्हणाला, “ त्ये मंगल वगैरे स्साग्ला मी काढून देऊ शकतो.” बाईंनी हाकलला आणि लगेच तक्रार केली. दगुड कंपनी बाहेर.
वाचकाला आता वाटले असेल की एक चेंगीझ खान कमी झाल्यामुळे शांती पसररली असेल. पण छे हो! मी अजून तुम्हाला मुछ मंगोल बद्दल काहीच सांगितले नाही ! दगडा पेक्षा वीट माउ. तसाच दगुड पेक्षा मुछड परवडला.
प्रवीण : “मुछड पण काही खरा शिपाई नव्हे. राईफल स्वच्छ करण्याच्या नादात (मेग्झीन मध्ये गोळ्या असताना) चाप सुटला आणि स्फोटात बोटे गेली. स्वतः च्या निष्काळजीपणामुळे! राहिमतपूर चा आहे. गावात याचा पुतळा आहे म्हणतात. तिथल्या लोकांना याची खरी कथा माहित नाही.”
मुछड अंगाने काटक. मिश्या फिस्कार्लेल्या... मांजरा सारख्या. कपाळावर उभ्या चुण्या आणि त्यावर गंध. मारुती ची उपासना करून आल्यासारखा अवतार. विजार कायम बुटावर २ इंच तरंगणारी. मिलिटरी चा दारूभत्ता चालू असावा. मुछड स्वभावाने एकदम ‘डायरेट’. मूड असला तर खूप काम करेल. नसला तर ‘गपचीप’ निघावे. दगुड आणि मुछड ही जोडी, प्रिंट रूम या किल्ल्याचे किल्लेदार.
तिसरी व्यक्ती नॉनआर्मी..”अवो भालजी पेंढारकर तुमचे कोण.” (या प्रश्नाचा आणि records चा की संबंध आहे अजून कळले नाही.) कदाचित अतिशय कंटाळलेल्या अवस्थेतले लोक माझ्यावर हा प्रश्न फेकतात. अरुण जोन पाटवडेकर या व्यक्तीचे नाव. डोळे तारवटलेले. दगडू कडून कदाचित आर्मी कॅन्टीन मधून बाटली (पैसे न देता) बळकावली असावी. दांडी मारून बरेच दिवस गायब, पण कधी कधी कामावर हजर.
आपली माहिती सांगत. माझी आज्जी ब्रिटीश होती. मी विचार करत होतो , "जोनराव ची आई ब्रिटीश?? मी ही झगावाली पिठलं भाकरी जोनरावला वाढताना कशी दिसत असेल." आणि हा बिलंदर? (थोडाफार सिनेस्टार जगदीप सारखा दिसायाचा.)आपल्या सर्व दुर्गुणाची इतरांना माहिती असल्यामुळे हा १/४ ब्रिटीशपण त्याला कधीतरी इम्प्रेशन मारायला कामी यायचा.
प्रिंट रूम हा records चा अविर्भाज्य् भाग, पण प्रमुख भाग आमची drawing सांभाळणारा. कुठले drawing हवे असल्यास ‘रीकिशन’ भरावी..कारण सांगावे. मग तास दोन तासांनी फिरकावे . प्रिंटर लोकांपेक्षा येथील भाषा थोडी मृदू. या सर्व विभागाचे संचालक आंबेडकर नावाचे एक सद्गृहस्त. प्रवीण यांना छळण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करीत असे. आंबेकर कधी कधी जागेवर डुलक्या काढायचे. ( आता records चा कामही तसेच. ) एकदा मला तिथे थांबवून, आता मजा बघत राहा म्हणून सांगून गायब झाला.
थोड्यावेळाने आंबेडकरांचा फोने खणखणला. झोपेतून उठले आणि..
‘हेलो.’
‘हेलो’
‘हेलो’
‘हेलो$$$$$$$’
प्रवीण शेठनी फोन कधीच खाली ठेवला होता (काही ना बोलता) आणि लांबून डोळे मिचकावत होता. हा याचा नेहमीचा विरंगुळा असावा. “तोंडातून थुंकी उडेपर्यंत, “हेलो” म्हणायला लावला की नाही?”
records चा एक कोपरा बर्याच गणितग्यांनी भरलेला असायचा. records आणि गणिती? ४-५ वाजले कि मटक्याचे आकडे , अति पूर्वी कडील राज्यांच्या lottery, कालचे जिंकलेले नम्बर आणि उद्या लावायचा “चौव्वा” ठरत असे. statistics वर चर्चा होत.
मला अजून एक गृहस्त नेहमी आठवतात. ओंकार ना माझ्याबद्दल प्रशिक्षणार्थी असल्या पासून थोडी सहानुभूती होती. एकदा हात बघून म्हणाले, “ तू खूप मोठा माणूस होणार. मी खर सांगतो.”
डोळ्यात पाणी आले आणि वेळ पण तशीच होती. वाटले , आपण तर खूप जुनिअर, पण या माणसाला तरी आपली काहीतरी किंमत आहे. माझ्याकडून काही फायदा नाही तरी??
लगेच बिलास्कर बोलले. "हं. उद्या फक्त एक लक्षात ठेवा. गाडी मधून जाताना आमच्यावर पाणी उडवत जाऊ नका. जरा नीट बघा रस्त्याच्या कडेला, आम्ही असू आणि तुम्ही जाल चिखल उडवत.”
माझी पुढे जायची काही चिन्ह दिसत नव्हती. ६ वर्षे एका ग्रेड मध्ये काढली. तरी या साध्या लोकांचा मला पाठींबा होता. ‘अरे साहेबाला नाही कळले तर आपली किंमत काही कमी नाही होत. आज ना उद्या लोकांना कळेलच.”
माझ्या लग्नानंतर काहीच दिवसात ओंकार निवृत्त झाले. मी कार्यक्रमाला जाऊन भेट घेतली. दोन वर्षांनी मी दुसरीकडे नोकरी करू लागलो. ओंकार आणि माझे इतर मित्रांचे आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे पुढचा प्रवास सुखाचा झाला. १४ वर्षाच्या प्रवासात वेग वेगळी माणसे भेटली. प्रत्येकाचा “रेकॉर्ड” ठेवणे अवगढ. पारश्या च्या कंपनीत नोकरी करण्याचा अनुभव वेगळा होता आणि आता एका अमेरिकन कंपनी मधील विविध देशातील माणसे आणि प्रत्येकाची वेगळी style च्या मी वळणी पडत होतो.
काही वर्षांपूर्वी मला परत जुन्या कंपनीत जायचा योग आला. सगळच बदलून गेल होत. records चा भव्य विभाग आता एका कोपऱ्यात २ माणसांवर चालत होता. अमोनिया प्रिंटींग कालबाह्य झाले. प्रिंट drawing आता ३डी झाली आणि पूर्वी पेक्षा अधिक माहिती कमी वेळात (अर्थात न अडखळता) मिळू लागली.
मीटिंग, आता स्क्रीन समोर बसून होऊ लागल्या . ए झिरो प्रिंट गायब झाले आणि त्याआधी आमची मोठाली टेबल संकुचित झाली. २ व्यक्तीच्या जागेत ४ बसू लागल्या. फायलींची गरज राहिली नाही. पी डी एफ फायल नी लेटेस्ट अप टू डेट माहिती मिळू लागली. माझ्या नशीबाने design ऑफिसात मी एक खूप मोठा बदल बघितला. या सर्व बदलाची खरी किंमत मी जाणू शकतो. कदाचित नवीन पिढी त्यांच्या पन्नाशीत अजून वेगळे काहीतरी बघेल .
लोक आणि त्यांच्या आडकाठ्या आता फक्त सरकारी ऑफिसात दिसतात आणि जुने दिवस आठवतात.
या सगळ्या प्रगती मध्ये मात्र आमची जुनी माणसे आणि त्यांच्या भोवतील कथानके पण विरून गेली. त्यांनी काढलेली रेखाटने, आता CAD मोडेल्स मध्ये रुपांतरीत झाली. त्यामुळे drawing आणि त्यावरील सही करणारी लोकांचे intellectual property वरील हक्क समाप्त. design च्या मागचा designer, काळा च्या चक्रात गायब झाला. कधी वाटते कि आपले एक तरी जुने रेखाटन चुरागाळलेले मिळाले तरी माझ्या साठी अतिशय बहुमोल असेल.
तेव्हाचा नवीन कोरा करकरीत कागद आता महत्वाचा वाटत नाही कारण कॅड मध्ये प्रत्येक गोष्ट कायमच नवीन राहते. (माणसाच्या सही सहित.)
No comments:
Post a Comment