Saturday, May 2, 2020

Shadows of Kedar

केदारचा श्वेत शालू  



ज्याकाळी हे घडले त्याबद्दल थोडे !
गंगोत्रीमध्ये  वीज नव्हती. टेलेफोन ही नव्हता. फारशी गर्दी देखील नसे .
उत्तरकाशीतून घरी खुशाली कळवण्यास ट्रंक कॉल करायला लागत असे.
गिर्यारोहणास लागणारे सर्व सामान भाड्याने मिळत असे.
कोफ्लाच  चे प्लास्टिक बूट म्हणजे श्रीमंतीचे लक्षण.
स्क्रिव कॅराबिनेर महाग म्हणून स्नॅपलिंक वापरात असत.
टोपोशीट  वाचण्याइतपत मॅप रिडींग आवश्यक असे. अनेरॉईड बॅरोमीटर वरून
उंची कळत असे (ती देखील  १५०००फट पर्यंतच)
मोबाइल , satelite  मॅप, गूगल  सर्चवगैरे बऱ्याच नंतरच्या गोष्टी.
फारशी  माहिती नसताना केलेल्या मोहिमेत  एक्सप्लोरेशनची मजा काही वेगळीच असे.
साधन विकत घ्यायला ऍमेझॉन- डेकॅथलॉन  नव्हते .
कस्टमच्या दुकानात जप्त झालेले  विदेशी सामान मिळत असे. 
वॉल्कमन  सर्वसामान्य   माणसांना माहित  नव्हता .
निप्पो/नोविनो / एव्हररेडीचा जमाना . duracell  नव्हता.
टॉर्चमधे फिलॅमेंट ब्लब  (दोन तीन अधिक बाळगावे लागत .)
एस एल आर कॅमेरे मुंबईत vt  च्या गल्लीत मिळत. (गॅरंटी नसे.)
अर्थात आमच्या आधीच्या काळातील मोहिमांना अजून वेगळ्या challenges.


मे १९८६

शिखर सर करण्याचा दिवस. पहाटे  ३ वाजता  हार्नेस ,बूट  व  जॅ केट   चढवून ,
रोप अडकवला. काळ्या कभिन्न अंधारात तंबू बाहेर पाऊल  ठेवले ,तर सर्वच खडकाळ.
बोचरा वारा .  पुस्तकात आणि इतर रिपोर्ट्स मध्ये तर भरपूर बर्फाचा उल्लेख होता ,
पण हे  अपेक्षे पेक्षा काहीतरी वेगळेच दिसत होते .
Petzl चा हेड टॉर्च लावून आम्ही वरच्या दिशेने सरकलो.
मन खिन्न! अपेक्षेपेक्षा खूपच कमी बर्फ. ज्या crevasses ची भीती होती त्या ऐवजी, सर्वत्र 
काळा खडक.  उजाडू लागले आहे ,पण बर्फ कुठेच नाही.
शिखराचा शेवट  कधी आला  हे समजलेच नाही . 
शिखरावर एक काळा वृक्ष फांद्या पसरून उभा.
२२४४० फुटावर वृक्ष ?  हिमालयातील मोहिमे कडून झालेला अपेक्ष भंग. 
हे  झाड तर सह्याद्रीत ही देखील दिसले असते ! उत्कंठा धुळीस मिळाली होती .
विचार केला,  या साठी  का गिर्यारोहण शिकलो? 




सकाळचा साडे  सहाचा गजर झाला आणि स्वप्नातून खडबडून जागा झालो.
नेहमीच पडणारे हे स्वप्न आज परत! आठवले, अजून तीन महिन्यांचा कालावधी उलटायचा आहे. 
मोहिमेच्या पॅकिंगला सुरुवात व्हायची आहे. कुठे शिखराची माहिती मिळते का, यासाठी 
अट्टाहासाने, रान रान पालथे घातले होते. काही बंगाली मोहिमांची माहिती मिळाली होती,
पण केदारनाथ शिखराबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती.

आंद्रे रोच आणि तेनसिंगने यांनी शिखरावर पहिली चढाई केली होती.
केदारडोम वर बऱ्याच मोहीमा जाऊन आल्या होत्या. शेवटी इंडियन माऊंटेनिअर मासिका
मध्ये , भारतीय वायू सेनेच्या एका मोहिमेची माहिती मिळाली, एका हवाई छायाचित्रा सकट,
ज्याच्या आधारे केदारनाथ चा वरचा कडा दिसत होता.  पण खालचा कडा, अजूनही एक कोडे 
होते.



या शिखराच्या मोहिमेत स्थान मिळावे म्हणून, गिरीश आणि मी उत्तरकाशी मध्ये बेसिक कोर्स
केल्याला  अजून ६ महिने पूर्ण व्हायचे होते. एकोणिसाव्या वर्षी  हौस दांडगी. खडकवासल्या
ची बस गाठून थेट NDA  च्या गोलमार्केट मधून फुल बाह्यांच्या कॉटन  T-shirt मध्ये  गुंतवणूक
केली. नवीन हंटर बूट होतेच. एक टुरिस्ट फ्रेमची सॅक विकत घेतली होती, ज्याचा उपयोग
डोंगरांमध्ये शून्य.  खर्च बेताचाच करायचा असल्यामुळे त्यालाच छोटी लूप शिवून लावली, 
ज्यात बर्फाची कुदळ (आईस  एक्स) अडकवता येईल. 


टिळक  रोड वरील साने मास्तरांची खोली, आमच्या मीटिंग साठी  रिकामी असायची.
जुन्या बाजरातून किटबैग आणून बिकीटाचे पत्र्याचे डबे  एकावर एक, असे जमवायचो.
रुरु चपाती नावाची नुकतीच मार्केट मधे रेडीमेड चपाती मिळायला  लागली होती.
प्रत्येकी दोन  चपात्या,  असा हिशेब. टोमेटो सूप गिट्स कम्पनी चे.  भात फक्त बेस कॅम्प  पर्यंत,
कारण  त्यासाठी प्रेशर कुकर व ईंधन वाहून नेणे  हे अल्पाइन पद्धतीने परवडणाऱ्या सारखे
नव्हते. साखर वर्ज्य .  त्याऐवजी स्वीटेक्स ने चहा  गोड करायचा.


केरोसीन चा एक स्टोव्ह,कॅम्प १ पर्यंत न्यायचे ठरले होते. त्याच्यावरील कॅम्प साठी LPG गॅस
चा छोटा सिलिंडर . सॉलिड फ्युएल चा एक स्टोव्ह आणि टिक्क्यांचे पाकीट देखील गरज
पडल्यास ठेवले होते.

स्वानंद  हा आमच्या मोहिमेचा प्रमुख. त्याच्या विचारात सतत केदारनाथ चा कडा.
साहेब कामाची विचारपूस करायला आला, तरी यांच्या डोक्यात १००० फूट दोर
पायथ्यापर्यंत कसा न्यायचा हाच विचार सतत चालू . या विळख्यात साहेबच गुंडाळला जायचा.
गरवारेने  दोर अर्ध्या किमतीत दिला.
कल्याणीनगरमधील वीकफिल्ड कम्पनीने कस्टर्ड आणि जॅम, तर साठ्यानी कोको चे डबे पुरवले.
कॅम्प मधील मेकाती मधून आर्मी चे स्वेटर विकत घेतले. त्याकाळी विंड चीटर फारसे चांगले
नसायचे, तरी रेनकोट स्वेटरवर चढवून आम्ही वेळ मारून न्यायचो.
बुटावर चढवायला गेटर आम्ही शिवून घेतले होते.


मोहिमेच्या मित्रमंडळीत स्वानंद, गिरीश व  मी होतोच.  प्रवीण नारखेडे, भूषण बापट  व हेमंत
काशीकर नंतर येऊन मिळाले. एका रात्री,सिंहगड खालील शाळेत मुक्काम करून सातूचे पीठ
पाण्यात उकळून खायचा उपक्रम केला.
सातू म्हणजे तिबेटमधील त्साम्पाला मराठमोळा पर्याय!
प्रवीण व भूषण चे मोहिमे नंतर लग्न होते. या सर्वांमधे मी एकोणीस वर्षांचा व गिरीश
माझ्याहून २ वर्षांनी मोठा. बाकी सर्व २६ ते २८ वर्षांचे. हेमंत काशीकर चाळीशीतला.


स्वानंद, भूषण, प्रवीण व मी ४ दिवसाचा ट्रेक नाशिक परिसरात एकत्र केला होता.
त्या ट्रेक च्या वेळेस मला गिर्यारोहणातीळ ग म भ न ही माहित नव्हते.
एकमेकांचे स्वभाव कळायला तशी वेळ यावी लागते. आमच्यावर राजधेर किल्ला  चढताना
तशी वेळ आली होती. राजधेर वर जाण्यासाठी गावातील एक माणूस किल्ल्याच्या मागच्या
बाजूने ३००फुटी कडा चढून वर जात असे आणि समोर च्या बाजूनी ८० फुटाचा एक दोर
सोडत असे. हा दोर काहीच महिन्यासाठी  असे. आम्ही जेव्हा गेलो ती पावसाळ्या  नंतरची,
दिवाळीची वेळ. तेव्हा हा दोर काढलेला होता. आम्ही समोरच्या भागात आमच्या सॅक रचल्या
आणि साधारण  दुपारी ३ ला ३०० फूट  कड्याची चढाई चालू केली.
भूषणच्या मागे मी, मग स्वानंद व  सर्वात मागे प्रवीण असे आम्ही चढत होतो. भूषण अतिशय
लवचिक आणि चांगला प्रस्तरारोहक (ROCK CLIMBER).
तो मला जरा टाईट बिले देऊन सांभाळून घेत होता. वर चढताना, झाडे किंवा दगड यांचाच
अँकर म्हणून उपयोग करत होतो. आम्ही सगळे वर पोचलो तेव्हा सूर्यास्त झालेला होता.
दुपार पासून काहीही खाल्लेले नव्हते. अंगावर टीशर्ट. समोरच्या बाजूने आम्ही दोर लावून
उतरणार होतो पण अंधारात किल्ल्याचे  दारच दिसेना. टॉर्च नव्हता.
आमच्या कडे स्वानंदचा सिगारेट लायटर होता. रात्र यावर काढायला लागणार होती.
हेमंत कुमार ची गाणी गुणगुणत आम्ही पाला पाचोळा जमा केला.
आजूबाजूला आडोसा नव्हता आणि अगदी उघड्यावर आम्ही शेकोटी केली.
ही आम्हाला रात्रभर पुरवायची होती. नाशिकची थंडी! इतर मंडळी घोरायला  लागली आणि
मी कुठून या ट्रेकला आलो हा विचार करत बसलो. रात्रीचे जेवण नाही.
बिस्कीटचे पुडेही  नव्हते.
सकाळी उठलो तर आम्ही ज्या दाराच्या शोधात होतो ते ३० फुटाच्या अंतरावर एका झुडूपा 
मागे होते. रॅपलिंग करून खाली आलो तर आमचे सर्व सामान सुरक्षित होते.
तिथून खालच्या गावात उतरून इंद्राई किल्ल्यावर जायची वाट शोधली.
दुपारी वर पोचलो आणि खिचडी चुलीवर चढवली.तेवढ्यात  एक गुराखी आला आणि म्हणाला
, " इथे झोपनार व्हय?" आम्ही मान  हलवून होकार दिला.
तर तो म्हणाला. "इथे जनावर आहेत. काल  माझी गाय  मारली इथे."
आदल्या रात्रीचा प्रकार आणि गेल्या तीन रात्रीची झोपमोड! आमचे ठरले होते.
वाघ आला काय किंवा सिंह. आम्ही हलणार नाही! या सवंगड्यांबरोबर एक रांगडा ट्रेक केला.
चंदन वंदन, कोळधेर, राजधेर, इंद्राई, चांदवड आणि अजून एक दिवस वाढवून भर पावसात
अंजनेरी. 
भूषण मूळ अमरावतीचा. ग्रीव्स कॉटन मध्ये वर्कर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता!
चेहऱ्यावर कायम स्मित. अंजनेरी च्या खालच्या गावात दाखल झालो तर  आम्हाला
बघायला सगळे  गाव आले. अत्यंत अदबीने चौकशी. आम्हाला शाळेत  झोपायला जागा दिली.
मग एकाने सॅक कडे बोट दाखवून विचारले, " हेच का फवारणीचे सामान?"
गावकरी  आम्हाला पेस्ट कन्ट्रोल वाले समजले. रात्रभर आम्ही पोट धरून हसत बसलो होतो.
भूषणचे वर्हाडी स्टाईल, अमरावतीचा अडाणी पुण्यामंदी , हे कथानक ऐकून तर पोटात कळा
यायच्या बाकी !
प्रवीण तर माझा रॉक चढायला  शिकवणारा मास्तर. तो सहा फुटी!
जिथे पकड घ्यायला मला हात वर करावे लागायचे ते त्याला खांद्याशी असायचे.
मला  म्हणायचा. "असे लोम्बकाळू नकोस. किती सोपे आहे हे."
प्रवीण टेलको मध्ये सिविल इंजिनिअर. मूळचा जळगावचा पाटील.
भेदक दाढी मिश्यांच्या मागे अतिशय प्रेमळ स्वभाव आणि मनमिळाऊ. 
भूषण व प्रवीण येत असल्यामुळे आमची मोहीम यशस्वी होईल या बद्दल मला खात्री होती.


गाडी रुळावर!


असं हे 'स्नेहसेवा गिर्यारोहण मंडळ' जम्मू तावी एक्सप्रेसने दिल्लीस रवाना झाले,
तेव्हा मला बटाट्याची चाळ  ते बोरीबंदर स्टेशनची भ्रमण मंडळाची पळापळ आठवल्यावाचून
राहिले नाही. मोहिमेचे सर्व सामान किट बॅगच्या फेऱ्या, त्या गाडीत भरणे आणि उतरवणे,हा
आता नेहेमीचाच उद्योग होणार होता. दौंड स्टेशन वरील ऑम्लेटचे पुरेपूर  कौतुक करून
हादडल्यावर,  स्वानंद आम्हाला पेन्टॅक्स कॅमेरा वापरायचे धडे देत होता. फोटो काढायची
वेळ सकाळी ९ च्या आत व संध्याकाळी चार नंतर, कारण, तेव्हा सूर्याची किरणे तिरपी
असल्यामुळे सावल्या छान पडतात. यूव्ही किरणांचा उत्सर्ग या वेळात कमी असतो.


माझ्याकडे झेनिथ १२एक्स पी नावाचा रशियन कॅमेरा, जो पूर्णपणे मॅन्युअल होता.
त्याचे स्पॉटमीटर देखील बंद पडले होते व त्यामुळे सर्व फोटो अंदाजानेच घ्यायला लागायचे.
या  कॅमेऱ्यात इलफोर्ड कंपनी चा ISO  ६० ASA  चा कृष्णधवल रोल होता.
ओरवो च्या पेक्षा इलफोर्ड चे फोटो जास्त चांगले यायचे, असे त्यावेळचे फोटोग्राफर म्हणत.
असे दोन रोल मी जवळ बाळगले होते.  झेनिथचे वजन पेन्टॅक्सच्या दुप्पट..म्हणजे किमान 
१.५ किलो. ५८मिमी चे  भिंग जे बरणीच्या  झाकणासारखे फिरवून बसवत.


मोहिमेमध्ये वाचायला मी अन्नपूर्णा शिखरावरील मॉरिस हरझॉग चे पुस्तक घेतले होते..
त्या पुस्तकात, अन्नपूर्णा शिखराच्या तळावर पोचण्यासाठी केलेला खटाटोपाचे वर्णन  होते.
ही  एक वेगळीच मोहीम होती. कदाचित केदारनाथच्या तळाला पोहोचताना असेच काही
घडेल, हे मनात कोठेतरी दडले होते. सर्वसामान्य माणसाच्या डोक्यात केदारनाथ म्हणजे देऊळ.
हे देऊळ आम्ही चढणाऱ्या कड्याच्या १८० डिग्री उलटीकडे.
(अन्नपूर्णा बेस आणि मुक्तिनाथचा फेरफटका आठवल्यावाचून राहवेना.) 
शिखरावरील वृक्षाचे स्वप्न अधून मधून पडतच  होते, कदाचित उत्कंठे मुळे असावे!


आमच्याकडील  यंत्रसामुग्रीदेखील ५३ सालच्या एवढीच जुनीपुराणी.
बुटांसारखी अत्यावश्यक गोष्ट आम्ही उत्तरकाशीहून भाड्यानी घेणार होतो.
सहा फुटी प्रवीणचे पाय १२ नंबर.  बेसिक कोर्सला मला ९ नंबर मुश्किलीने मिळाला होता.
बरेचकाही  देवाच्या भरवश्यावर होते.


दिल्ली स्टेशन वर सामानाची एक लोड फेरी स्टेशन बाहेर नेण्यात  व दुसरी सायकल रिक्षा
पर्यंत. हमाल वापरायचे नाहीत, कारण काहीच दिवसांनी आम्हीच सुपर हमाल होणार होतो.
एक भरलेली सॅक आणि त्यावर एक किंवा दोन किट बॅग मानेवर. साधारण २५ ते ३० किलो .
अश्या दोन फेऱ्या, प्रत्येकी. हा सर्व प्रकार आम्ही निमूटपणे सहन करत होतो,
कारण हा तर वॉर्मअप होता!


आय एस बी टी स्टेशनबाहेर ऋषिकेशची बस गाठली.
सर्व सामान चढवून दोराने बांधून आवळले . आलू  पराठा,  दही आणि  लोणचे हादडून
बस गाठली आणि एकदाचा रात्रीचा प्रवास सुरु झाला. बाहेरील काळोखाकडे बघत
यमुनेच्यातीरी काही पूर्वीची स्थळे शिल्लक आहेत का याचा शोध घेत होतो.
माझे बालपण आठवले. लजपतनगर, गुलाबाची बाग आणि भासू. (१९७४)


भासू तमिळ होता व कदाचित तो देखील माझ्यासारखा दिल्ली पासून दूर  गेला असावा.
आमची  पोर्ट ब्लेयर ला बदली झाली आणि ताटातूट होऊन आता ८ वर्ष झाली होती.
वाटले, जर भेटलो असतो, तर मी गिर्यारोहणाचे अनुभव सांगत बसलो असतो.
केदारनाथ शिखर किती अवगढ आहे आणि अल्पाइन पद्धतीने गिर्यारोहण करणारे  भारतात
किती कमी लोक आहेत. भासू परत अंधारात गडप झाला आणि मी परत माझ्या स्वप्नात रमलो.
काळा  खडक आणि ते झाड. काय अर्थ असावा याचा? स्वप्न नकारात्मक आहे? 
मी या शिखराला कमी तर लेखत नाही न ! बघितलेल्या सर्व फोटो मध्ये, केदारनाथ
हे एकच शिखर पूर्णपणे बर्फाच्छादित! अतिशय मोजका खडक.
स्वप्नाचा कल ग्लोबल वॉर्मिंग कडे तर नसेल?
मी वाचत असलेल्या पुस्तकात अन्नपूर्णा शिखरावरील शेवटचा टप्पा .
हेरझॉग आणि टेरेचा क्रिवास  मधील  बिवोक ! हे झपाटलेले वीर माझ्या आजूबाजूला
प्रोत्साहन देण्यास उभे. केदारनाथ चा अदृश्य कडा आमची वाट पाहत होता.
बाहेरील  वारा आता बोचू लागला होता पण माझ्या भोवती इच्छाशक्तीचे अदृश्य कवच,
ती थंडी झिडकारत होते. डुलकीतून  जाग आली  तेव्हा कंडक्टरचा , रिशकेश ..रिशकेश 
जप चालू होता. पटकन बसवर  चढून सामान उतरवून २ लोड फेऱ्या केल्या आणि  थन्डी गायब!


प्रवास सुरूच होता. तडक सायकल रिक्षा करून गढवाल बस स्टॅन्ड. उत्तरकाशी ची बस
लागलेलीच होती. लहान व्हील बेस वर रचलेला मनोरा, ज्यावर, आमचे सामान बांधून
आम्ही डोलारा वाढवला. बसमध्ये घामाचा व विडीचा वास, पण अतिशय प्रेमळ
गढवाली लोक. काही बंगाली मफलर अन कानटोप्या देखील मागच्या बाकावर सामोसे
आणि भजी   चरत बसल्या होत्या.
ड्राइवरनी चावी मारली आणि सर्वत्र डिझेलचा धूर पसरला. घाट चढत चढत नरेंद्रनगर,
चम्बा, टिहरी (पूर्वीचे भागीरथी किनाऱ्यावरचे ), चिन्याली  सौड करत करत बस उत्तरकाशीला
पोचली,तो पर्यंत सर्व हाडे खिळखिळी झाली होती.
बसच्या टपावर चढून सर्व कीटबॅग  व रकसॅक, गिरीश व मी दोराच्या गुंतवळ्यातून 
सोडववल्या आणि खाली उतरवल्या.


माऊंटेनिर्स नेव्हर क्रिब!
बस स्टॅन्ड ते भंडारी हॉटेल ची लोड फेरी सम्पवून,  मी रस्त्याच्या कडेला  दम घेत उभा होतो.
  एक डौलदार कुत्रा माझ्याजवळ शेपटी हलवत उभा राहिला. मी त्याला ओळखले नव्हते,
पण त्यांनी मला अचूक ओळखले. शेजारीच निमची बस उभी होती. हा तर काळू !!
६ महिन्यांपूर्वी आमच्या बरोबर बेसिक कोर्स ला हा पट्ठ्या आला होता. तेव्हा, गिर्यारोहकांच्या
थाळीतील एक भाग, काळू साठी राखीव असे.  या प्रेमळ कुत्र्याने ओळख ठेवली होती.
कोर्सच्या मेनूमध्ये सॉसेज नावाचा उग्र पदार्थ असे जो मी या कुत्र्यासाठी राखीव ठेवत असे.
त्यामुळे काळू बहुतेक मला सॉसेजअवतार समजत असावा.

हॉर्न वाजल्यावर काळू निम च्या बस मध्ये चढला आणि आम्ही देखील निमला सामान
भाड्याने घ्यायला  निघालो.


Nehru  Institute  of  mountaineering  च्या आवारात कोर्सची मुले  नसल्यामुळे सामसूम
होती. निम चे प्रिंसिपल कर्नल बजाज, ऑफिसात  होते,त्यामुळे त्यांची भेट घायला गेलो.
पिळदार मिशीतून स्मित बघून पूर्वीचे दिवस आठवले.
स्वानंद ने सुरुवात केली, " आमचे उद्दिष्ट केदारनाथ आहे."
कर्नल बजाजनी  परत विचारले, "केदार डोम? की केदारनाथ?"
स्वानंद ठाम पणे उत्तरला, " केदारनाथ."
कर्नल बजाज जरा गंभीर झाले. " तुमची चढण्याची स्ट्रॅटेजि?"
स्वानंद, " आम्ही सर्व समिट पर्यंत एकत्र जाऊ. अल्पाइन पद्धतीने."
बजाज, "तुमचा उत्साह वाखणण्यासारखा सारखा आहे. मला कौतुक आहे.
पण या मोसमात हिमप्रपात खूपच जास्त झाला आहे."
" केदारनाथ हे अवगढ शिखर आहे. वरपासून खालपर्यंत कुठेही रॉक दिसणार नाही,असे शिखर
मी त्याशेजारच्या भरते कुंठा शिखरावर मागच्या वर्षी मुलींची टीम नेली.
या मोसमात कमरेपर्यंत बर्फ होते . कधी कधी छाती पर्यंत"
"मुलीं बरोबर छाती पर्यंत बर्फ तुडवण्यात काही मजा नाही." कर्नल मिश्किलपणे हसले .
नंतर  कर्नल जरा गम्भीर झाले व म्हणाले, "मागच्याच वर्षी तुमच्या पुण्याचे गिर्यारोहक
सतोपंथ वर चढाई करायला गेले आणि..."


आम्हा सर्वांना ही  दुःखद मोहीम माहित होती.
मिनू, भरत व नंदू, तिघे avalanche  मध्ये दाबले गेले. फक्त एक पोर्टर परत आला ,
हिमदंश  अनेक ठिकाणी. पुण्यातील सर्वोकृष्ट गिर्यारोहक नाहीसे झाले होते.


कर्नल म्हणाले, " अशा वेळी, rescue मोहीम अपुरी पडते.हेलिकॉप्टर चे ceiling
कमी असल्याने २१००० फुटावर वर जाता  येत नाही. शोध पथक पाठवायला इतका वेळ
जातो की  गिर्यारोहक, तेवढा वेळ तग धरू शकत नाहीत . ही वस्तुस्तिथी आहे!"
"तुम्ही केदारनाथ ला जात आहात. या शिखरावर हिमाचे प्रमाण, सतोपंथ पेक्षा अधिक आहे.
त्यामुळे काळजी घ्या एवढेच म्हणणे आहे. क्लाइंबिंग डाउन इन १ पीस इस मोस्ट व्हाईटल ."


मला आमचा कोर्स आठवला. सर तेव्हा म्हणाले होते, "माऊंटेनिर्स नेव्हर क्रिब."
आता हेच सर आम्हाला दक्षतेचा इशारा देत होते, म्हणजे परिस्थिती अवघड होती.
हिमालयात शिखर बुक करताना जो कालावधी दिलेला असतो तो पाळावा लागतो.
त्यात मोसम खराब झाला तर चढाईची शक्यता कमी होते.


स्टोअर्स मधून सामुग्री घेतली आणि लक्षात आले की प्रवीणच्या आणि स्वानन्दच्या मापाचे बूट
नाहीत. बजाज म्हणाले, "काळजी करू नका. एक ऍडव्हान्स कोर्स गोमुखला आहे.
त्यांच्या कडे बूट मिळू शकतील."
"पण एक विंनती आहे . तुम्ही जे शिखर बुक केले आहे,त्यावर एक ऑस्ट्रेलियन टीम आहे.
अनधिकृत चढाई. त्यांच्या विरुद्ध कृपया  डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटकडे तक्रार नोंदवा.
त्यांचा लायसन ऑफिसर लाचखोर आहे."


स्वानंदने डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफिस गाठले आणि एक तक्रार नोंदवली.
त्याची कॉपी गंगोत्री पोलीस स्टेशनमध्ये दाखवायची होती. प्रवीण खिन्न होता.
गुढगाभर बर्फ असल्यामुळे तो बेस पर्यंत येणे ही कठीण होते.
आम्ही सर्व त्याच्याशी सहानुभूतीने वागत होतो.


पतियाळा ढाबा मध्ये आम्ही सर्व रात्री जेवायला बसलो. प्रत्येक जण आपल्या दुनियेत होता
कारण गेल्या तीन महिन्यांची तयारी पाण्यात गेलेली दिसत होती.
बैंगन भुरता, दालफ्रायची चवच लागत नव्हती. आमच्या समोरच्या टेबलवर एक धिप्पाड
युरोपिअन जेवत होता. एक शंका आली की हा कुठल्यातरी मोहिमेसाठी तर आला नसेल?
प्रवीणने  चौकशी केली व म्हणाला , "आम्ही एक्सपीडीशन साठी आलो आहोत. तुम्ही पण?"

ते उत्तरले ," नाही, पण  मी ट्रेक्स करतो. सध्या डोडीताल मध्ये ट्रॉउट फिश फार्मिंग चा
प्रयत्न करत आहे."
प्रवीणने  स्वतः चे दुखणे गायले,  तर तो माणूस हसला आणि म्हणाला.
"एवढेच? मी तुम्हाला माझे बूट देऊ शकतो. मी मागच्याच वर्षी दिल्लीतून हे बूट विकत घेतले.
फक्त मसुरीला माझ्या घरी जावे लागेल."


या देव माणसाने आमचा  एक यक्ष प्रश्न,क्षणात सोडवला. मी तसा स्वभावाने अबोल.
इतर लोकांमध्ये कमी मिसळणारा. या एका प्रसंगाने मला एक फार मोठा धडा दिला.
प्रयत्न केले तर काहीही साध्य होऊ शकते. फार विचार न करता संवाद साधावा.
भली माणसे आजूबाजूला असतातच. अशी अडचण कोणावर येईल, सांगता येत नाही,
पण आपण एकमेकांचे प्रश्न इच्छा असेल तर सोडवू शकतो. शक्य झाल्यास मदत जरूर करावी,
फळाची अपेक्षा न बाळगता.


निसर्गाचे  आव्हान आम्ही टाळू शकत नव्हतो. प्रचंड हिमांतून आम्हाला वाट काढायची होती.
रॉकेल चा अजून एक कॅन घेतला, कारण बर्फ खूप खालून लागणार होते.
माझ्या डोक्यात परत विचार सुरु झाले. "Mountaineers  never crib!"
प्रवीण सकाळची बस पकडून मसुरीला गेला आणि आम्ही लो-अल्टीट्युड हमालांच्या शोधास
लागलो.


माझ्या काळ्या प्रस्तरावरील वृक्षाच्या स्वप्नाला पूर्णविराम लागणार होता.
बर्फच हवे होते ना? तेही मिळाले, मुबलक !


भांडारी लॉज आणि माऊंट सपोर्ट 


भांडारी लॉज वरून समोरील टेकडीवर चढाईचा बेत ठरला. चढण अंगावर येईल अशी.
धापा टाकत, बकरीच्या धूसर वाटेनी वर सरकत होतो. चढण थोडी कमी होऊ लागली
आणि खाली उत्तरकाशी गाव तर समोर निम ची टेकडी,यामधून वाट काढणारी भागीरथी
लखलखत होती, एका कमरपट्ट्या सारखी. कॅमेराने प्रत्येकाचे पोर्ट्रेट टिपले आणि आम्ही
परतीस निघालो. लॉज वर पोहोचल्यावर दंड बैठकांचा कार्यक्रम! यामध्ये भूषण माहीर!
दण्डकाढता काढता मध्ये एक टाळी वाजवायची. माझा पहिलाच प्रयत्न हनुवटी वर पडला
आणि रक्त वाहू  लागले. आमच्या कडे स्प्रे असल्याने ही  जखम लगेच बुजली.


भांडारी लॉज कसे बांधले असावे हा एक सौंशोधनाचा विषय आहे. आर्किटेक्ट अथवा सिविल
इंजिनीअर यांचा कुठेही हातभार दिसत नव्हता.एकामागून  एक खोल्या बांधून, मग नदी कडे
त्याचा विस्तार केला असावा. मग वरचा माळा  चढवला असावा.
खालील हॉटेल मधील सर्व वेटर अतिशय निवांत. ऑम्लेटसारखी गोष्ट तासभराने यायची. 
मालकाची फारशी धंदा करायची इच्छा  दिसत नव्हती. त्याचे कार्टे  जंगलीतल्या 
शम्मी कपूरच्या पेक्षाही उद्धट, डेहराडून  रिटर्न्ड. वेटरला  मारहाण करण्यात याचा कोणीही 
हात  धरला नसता. धंदा पैसे खेचत होता, कारण, हॉटेल हमरस्त्यावर भरगावात.
बसचा थांबा जवळच. मालक निर्विकार पणे , कॉउंटर मागून गिर्हाईकाकडे बघत असे,
टॅंक मधील माशासारखा. चेहऱ्यावर   नवीन निश्चल सारखा हरवलेला  भाव.


गिर्यारोहणासाठी येणाऱ्यांचे पोर्टर ठरवणारे  माऊंट सपोर्टचे  ऑफिस, लॉजच्या  पहिल्या
मजल्यावर. हे ऑफिस चालवणारा एक धिप्पाड नेपाळी, जगदंबा. दिसायला अगदी
नेपाळी हीरो. टीशर्ट मधून कमावलेले शरीर झळकत होते, पण स्वभावात मग्रुरी नाही.
जिममध्ये नव्हे, तर  डोंगरात कष्ट करून कमावलेले शरीर. स्वानंद आणि जगदंबा पोर्टर्सच्या
वाटाघाटी करत होते. "साहब. केदारनाथ तो बहुत अंदर का पीक है. ६ दिन का हिसाब होगा.
बहुत बर्फ है भुजबासा  के आगे. HAP  नही  लोगे , तो बहुत मुश्किल है !"
स्वानंदने  त्याला परत समजावले की  ही  अल्पाइन पद्धतीची मोहीम आहे.
पोर्टरच्या चेहऱ्यावर भाव असा, की तुम्हाला कुठल्या स्टाईलनी मरायचे, हे आम्हाला काय 
सांगता! आपण आपला जिवंत राहायचा मार्ग सांगितला!


शेवटी, पोर्टरची जमवाजमव झाली आणि पहाटेच्या बसची तिकिटे ही निघाली.
प्रवीण मसुरीहून त्याचे बूट घेऊन संद्याकाळी परतला.
त्या रात्री डुलकी कधी लागली हे समजलेच नाही.


गंगोत्री 


भटवाडी, गंगनानी , भैरोघाटी  करत करत आमची छोटुकली बस, गंगोत्रीला संध्याकाळच्या
मुक्कामी पोहोचली. (रात्री घाट बंद असे.) विड्याचं वासाचे बस प्रवासाशी एक अतूट नाते आहे
हे मला समजले होते.  कमी प्राणवायूची सवय आधीपासूनच अंगवळणी पडली होती.
तरी  मी धूम्रपानापासून चार हात लांबच.
संध्याकाळचे चार वाजले तेव्हा आम्ही आमच्या लॉजवर पोचलो. तिथे फक्त झोपायची सोय 
होती. बाकी सर्व "कार्यक्रम" वावरात.
गंगोत्री  मन्दिराजवळ एक मोठी  शिळा आहे .
तीन पोर्टर त्या शिळेवर चढाईचा प्रयत्न करत होते. शेवटी एक जण जिंकला. त्याचे ओझे,
इतर दोघांनी शर्ती प्रमाणे वाटून घेतले. सूर्यास्त झाल्यावर थंडी वाढली आणि आम्ही देवळाकडे
आरतीसाठी वळलो. गर्दी असलेली देवळे मी टाळतो, पण गंगोत्री चे देऊळ इतरांपेक्षा वेगळे
वाटले. गर्दी कमी, लांब लचक रांग नाही. पूजेनंतर वैष्णव धाब्यावर कांदा-लसूणवर्जित 
डाळ भात  आणि पाणचट बटाटा रस्सा असे "यथेच्छ " जेवण , पाईनच्या लाकडाच्या चुलीवर
एक विशिष्ट स्वाद. थोडा फार टर्पेंटाईन सारखा.
काळोखात मिणमिणत्या टॉर्च च्या प्रकाशात आम्ही लॉज गाठले. लांबवर सुदर्शन पर्वत
दिमाखाने चमकत होता, चन्द्राच्या प्रकाशात. गंगोत्री मध्ये वीज नसल्यामुळे,
सर्व कारभार लालटेन च्या प्रकाशात चालायचा. आमच्या हमालानी  शेकोटी केली होती
आणि गढवाली गाण्याचे  सूर धगीप्रमाणे चढत उतरत होते. लॉज चा मालक, पंडितजी,
त्यांच्या मुंबई भेटीचे चित्तथरारक वर्णन, तिखट मीठ लावून बॉलिवूड च्या सिनेमा शी मिळते
जुळते असे कथानक, ज्यात हे सम्गलर  ना देखील भेटून आले. नंतर लक्षात आले की , पंडितजी
च्या ग्लासमध्ये "मज्जा" भरलेली आहे (आणि डोक्यात अजित व मोना डार्लिंग) .
कुठलीतरी रक्षी थंडी घालवण्यासाठी या तीर्थक्षेत्रात देखील मिळते, हे बघून जरा
नवलच वाटले.
गढवाली  गाणी लांबवर विरत गेली आणि स्लीपिंग बॅग मध्ये, माझा डोळा लागला.


शिखराकडे वाटचाल 


पोर्टर ना २५ किलो प्रत्येकी वाटल्यानंतर आम्ही स्लीपिंग बॅग कॅरीमॅट व स्वतःचे बूट हे सॅक
वर बांधले. सॅक मध्ये वजन वाटण्याची कला ही  सर्वात महत्वाची, कारण यावर संपूर्ण
दिवसाची दमछाक अवलंबून असते. तसेच, कुठेही दम घ्यायला  थांबले तर विंडचीटर
पटकन चढवता येईल, असा अडकवलेला. आम्हा सर्वांच्या सॅक मध्ये २२-२५ किलो लोड
असावे. त्यावर १.५किलो झेनीतचे लोढणे माझ्या गळ्यावर, एक्सट्रा.


गंगोत्री ते चिडबास हे ९ किलोमीटर चे अंतर.१० हजार  फुटावरून साधारण हजार फूट चढण.
समोर ठेलू व सुदर्शन शिखरे प्रथम दिसली. चिडबासला एक छोटा ढाबा.
फार टुरिस्ट नसल्यामुळे चहापुरता मर्यादित. धाब्याच्या मागेच गगनभेदी मंदा शिखर.
मला ते एवरेस्ट च्या बोनिन्गटन कड्यासारखे वाटले. पुढची वाट चिडाच्या जंगलातून .
समोर भागीरथी शिखरे दिसू लागली. बर्फाची नदी घसरून आमचा मार्ग चिरत गंगेला
मिळाली होती. डावीकडे उंच ठिसूळ दगड माती चे morraine  टॉवर्स उभे होते
आणि एक "चेतावनी " ची पाटी पाय पटपट उचलायला सांगत होती.
वरून बंदुकीच्या गोळीसारखे छोटे दगड चुकवत मनात "डाय अनदर डे " चा मंत्र जपत,
आम्ही  चढाईला तोंड देत होतो. रॉकफॉल  झोन सम्पला  आणि मी माझी रकसॅक
टेकवून, उजवीकडील विलोभनीय दृश्य न्याहाळत बसलो.
मंदा शिखराच्या मागील  भृगुपंथ व मेरू शिखरे पांढरी शुभ्र चमकत होती.
भृगुपंथ हिमनदीत कुठेही खडक दिसत  नव्हता. हिम फार खालपर्यंत येऊन ठाकले.
हे सर्व आमच्या पुढील पेचाची जाणीव करून देत होते. १२ किमी वर भुजबास. 
आश्रम आणि एक बारकेसे पोलीस स्टेशन. आमचे पोर्टर आश्रमात झोपायला गेले.
पोलीस स्टेशन च्या बाजूला एक छोटी खोली होती. आत खेचरानी  घाण केलेली होती.
सर्व झाडून,साफ करून देखील वास कमी झाला नव्हता. बाहेर बर्फात तम्बू लावण्यापेक्षा
आम्ही खोलीतच राहायचे ठरवले. 


बुद्धी सिंग हा आमचा कूक. त्याने कीटबाग मधून स्टोव्ह काढून पेटवला मूग डाळ खिचडी  व
गिट्स टोमॅटो सूप बनवायला घेतले. मी माझे क्लाइंबिंग बूट चढवून बाहेरच्या दगडी भिंतीवर
थोडे क्लाइंबिंग केले.माझा जपानी  बूट सिंगल लेअर लेदर आणि सोल  विब्रमचा.
विब्रम च्या ग्रिपशी  माझी गट्टी, पुढे अनेक वर्षे चालेल याची तेव्हा मला कल्पना नव्हती.
सिंगल लेअर बूट, सद्य परिस्थितीत, केदारनाथ सारख्या शिखरासाठी अयोग्य होता.


रात्री खोलीला खिडकी नसल्यामुळे,  घुसमटल्यासारखे वाटत होते. त्यात कमी प्राणवायू
आणि लीदेचा वास. कुस  बदलत रात्र काढली. पहाटे सॅक घेऊन गोमुख च्या दिशेने निघालो.
गोमुखाच्या अलीकडेच निम चे तम्बू दिसले.
आम्ही उरलेली सामुग्री त्या कॅम्प मधून कर्नल बजाजनी  दिलेले पत्र दाखवून मिळवली.
बूट मिळाल्यावर सर्वांचा जीव भांड्यात/ बुटात  पडला.


गोमुख गोठले होते आणि त्यातून निघणारा पाण्याचा प्रवाह  खूप कमी होता.
एका बर्फाच्या लादीवरून आम्ही नदी पार केली. गोमुख ते तपोवनचा नेहेमीचा मार्ग आता
प्रचंड हिमाखाली  दबला होता आणि आम्ही नवीन वाट काढत हळूहळू वर चढलो.
प्रचंड दमछाक होत होती व सूर्य तळपायला लागल्यावर २ फुटाची ढांग घसरत एका फुटावर
थांबायची. बर्फ लुसलुशीत होऊ लागला आणि पाय गुडघ्यापर्यंत रुतायला लागले.
सूर्यामुळे त्वचा भाजून निघत होती. सन स्क्रिन म्हणून त्यावेळी केवळ बोरोलीन उपलब्ध होते
आणि हिमालयातील यूव्ही  किरणांसाठी त्याचा उपयोग फार नव्हता.
गिरीश व मी प्रत्येक दहा पावलावर फतकल मारून बसायचो. उंची वाढत असल्यामुळे
प्राणवायू कमी. आमच्या भ्रमण मंडळाचे इतर सदस्य मागे बरेच लांब. हमाल त्याच्याही मागे.
कुठे लांबवर शिळा दिसली तर त्या रोखाने आम्ही आमची वाट वळवून,  तिथं पर्यंत न थांबता
जायचे लक्ष्य ठेवत असू . "गिऱ्या , एक ढग आला तर किती बरे होईल.
निदान थोड्यावेळासाठी तरी  देवानी कृपा करावी." आम्ही खालच्या तपोवनात
पोचलो होतो, पण वरचे तपोवन अजून ३ तासावर तरी होते.
धीर खचू लागला की मनात यायचे, हा तर केवळ दुसरा दिवस.
Mountaineers  never  crib .
पांढरी शुभ्र हिमनदी आणि क्वचितच दिसणारे खडक वर गडद निळे आकाश.
या पलीकडे दुसरा रंग नाही. अंतराचा किंवा खोलीचा अंदाज घेणे अतिशय अवघड.
आम्ही welding  goggle  च्या प्रत्येकी दोन जोड्या घेतलेल्या होत्या.
या पांढऱ्या जगात तो एकच polarizer. देवानी आमची प्रार्थना ऐकून, शेवटीं एक ढग
धाडलाच. पण जसा जसा त्याने सूर्य अडवला तशी पटकन थंडी वाढली.
आता आम्ही ढग जाण्याची वाट बघू लागलो.


आमच्या कॅम्पची  मोठी खूण  म्हणजे एक प्रचंड शिळा, खडा पथर नावाने प्रचलित.
असा  हा   खडा पथर डोक्यावरून एक फुटाची जाड शाल पांघरून बसला होता, त्यामुळे
तो दिसण्याआधी आम्हाला अजून एका मोहिमेचे तम्बू दिसले. मोहीम मुंबईची होती व ध्येय
होते केदारडोम. आम्ही आमचे तुंबू लावायला बर्फ तुडवायला घेतले. साधारण तीन तंबूंची
जागा तयार झाली तोवर दुपार झाली व इतर मंडळी देखील पोचली. स्वानंदनी  पोर्टर ना
जगदम्बा साठी चिट्ठी रखडली आणि आमची खुशाली कळवण्यासाठी काही पोस्टकार्डे ही
त्याच्या सुपूर्द केली.


तम्बूमध्ये लोळत मी जेवणाची वाट बघू लागलो. बुद्धीसिंगला एक न गोठलेला झरा सापडला
होता त्यामुळे आज बर्फ वितळवावे लागले नव्हते. बेस कॅम्प च्या मेनू मध्ये मुगडाळ खिचडी व
टोमॅटो सूप. काही दिवसात आम्हाला हे जेवण म्हणजे मेजवानी  वाटणार होते.
१५००० ft  वरील पहिली रात्र कुस  बदलत घालवली. खालचा बर्फ वितळून जमिनीला बाक
आले होते, पण त्याखाली माती होती हे नशीब. बेस कॅम्प किती नन्दनवनासारखा आहे हे
आम्हाला पुढे उलगडणार होते.


कॅम्प १ कडे प्रस्थान

स्वानंदनी बॅसकॅम्प पासून वर स्वेटर घालायला परवानगी दिली होती.
त्याच्या मते बेसपर्यंतची थंडी, कॉट्सवूल शर्ट भागवू शकतो . त्यावर एक विंडचीटर  चढवला
की दोन लेअरची हवेची पोकळी तयार होते व ती पुरेशी उब देते. मला आणि गिरीशला
फारसा अनुभव नसल्यामुळे आम्ही बेसपर्यंत आर्मीचा शर्ट घालून वावरत होतो.
आता उबेला स्वेटर आला. आम्ही सर्वांनी १५किलो सामान पुढच्या कॅम्पच्या लोडफेरी
साठी घेतले.


खडा पथरच्या पुढे गंगोत्री हिमनदीच्या काठाने आम्हाला कीर्ती हिमनदी प्रवेश करायचा होता.
शिवलिंग शिखरावरून आलेल्या कड्याला वळसा मारणारी वाट अत्यंत संकुचित व घसरडी
होती. समोर खरचकुंड नावाचे राक्षसी शिखर दिसू लागले. केदारडोमची पूर्वे कडची भुजा,
कीर्ती हिमनदीच्या उजव्या काठा पल्याड उतरली होती. एक ऑस्ट्रेलियन मोहीम याच रूट
ने चढाई करत होती. (यांच्याच बद्दल, कर्नल  बजाजनी  आम्हाला तक्रार नोंदवायला सांगितली
होती.)

त्यांचा कठीण रूट बघून मनात खंत  वाटली.  त्यांना ज्या शिखरासाठी परमिट दिले होते
त्यापासून ते फारच वेगळ्या ठिकाणी आरोहण करत होते. ते नियमात बसत नाही, म्हणून
बेकायदेशीर ठरवायचे हे मला पूर्णतः पटत नव्हते. हा आमचा रूट नव्हता आणि त्या
लोकांपासून आम्हाला त्रास नव्हता. कायद्याने, या लोकांनी केदारडोमची फी भरायला
हवी होती.


शिवलिंगची अर्धी प्रदक्षिणा झाली आणि आम्ही कीर्ती बामक (ग्लेशीयर) मध्ये शिरलो.
इथे हिमनदी अतिशय खडकाळ व अस्थिर. एका कोपऱ्यात मुंबईकरांनी ठाण  मांडले होते.

आम्हाला हिमनदी ओलांडून कॅम्प लावायचा होता,म्हणून आम्ही तसेच पुढे कूच केले.
अस्थिर जमीन व गुढग्याएवढे बर्फ  यांनी साधारण ३० मिनटात आमचा अंत बघितला.
एका छोट्याश्या सरोवराजवळ आम्ही लोड टाकले आणि एक लाल झेंडा फडकावला. साधारण
१६०००ft  च्या पुढे हा कॅम्प असावा.आमच्या या लोडफेरीचा मुख्य उद्देश १००० फूट दोर
व चढाईची सामुग्री पोचवणेहा होता.
संघ्याकाळी चहाच्या वेळी,आम्ही सोनी चा रेडिओ बारकाईने ऐकत असू.
बातम्या सुरु होण्याआधी ऑल  इंडिया रेडिओ वर आमच्या कोड साठी, हवामानाचा
अंदाज प्रसारित केला जायचा. पुढच्या हालचालींसाठी हा थोडाफार उपयोगी असायचा.
किमान अजून बर्फाचा तरी वर्षाव होणार नाही हे त्यावरून समजले.


अजून दोन दिवस लोड फेऱ्या करून, आम्ही सगळे कॅम्प १ ला हललो. भूषण व हेमंतनी 
बेस च्या पुढे न यायचा निर्णय घेतला. परतल्यावर भूषणचे लग्न होते आणि हेमंत आणि त्याने 
याहून जास्त धोका न पत्करण्याचा  निर्णय घेतला. माझ्यासाठी हा निर्णय न पचण्यासारखा
होता.हेमंतनी केवळ स्वतःसाठी एक सवंगडी फोडण्यात यश मिळवले होते तो ही, भूषण
सारखा एक तगडा गिर्यारोहक!

शेवटची लोड फेरी बुद्धीसिंग  आणि मी केली. आम्ही कॅम्प १ वरून बेस ला जाऊन उरलेले सामान आणले. वाटेत, बुद्धी मला म्हणाला, "साहब! अगर आप भागीरथी २ पर जाते तो एक
समिट निश्चित था. केदारनाथ थोडा मुष्किल है." बुद्धीसिंग स्वतः भागीरथी  २ ला जाऊन आला होता आणि त्याच्या मते तिथे बर्फ कमी लागले असते. किमान, मला बुद्धीसिंग कडून फिटनेस चा शिक्का मिळाल्यावर बरे वाटले.


कॅम्प १ वर परतल्यावर आमची एक बैठक झाली आणि त्यात स्वानन्दनी घोषणा केली 

की केवळ प्रवीण व तो शिखरावर जाईल. स्वानन्दनी  माझे बूट स्वतःसाठी घेतले.
त्याचे पाय ६no  आणि माझे ९no . एकावर एक अश्या दोन लोकरी मोज्याच्या जोड्या
घालूनदेखील बूट सैलच. माझ्या पायखालची जमीन काढून घेतल्यासारखे वाटले.
बूट नसलेली अवस्था म्हणजे माझ्या मोहिमेला पूर्णविराम. सर्व स्वप्नांचा क्षणात चुराडा
झाला होता. मला डावलून हा निर्णय घेतलेला होता आणि तो निष्ठुर पद्धतीने सांगण्यात
आला होता.
या सर्वांमध्ये मी जास्त कष्ट घेतले होते, दर दिवशी वर खाली लोड नेऊन.
त्या बदल्यात मी एक हाय अल्टीटूड हमाल ठरलो होतो.


दुसऱ्या बाजूनी विचार केला तर, स्वानंद आणि प्रवीण दोघे अनुभवी.
दोघांनी ऍडव्हान्स कोर्स केलेला. नवख्याना घेऊन काही बरे वाईट झाले तर हे जबाबदार.
शारीरिक क्षमतेचा विचार बाजूला ठेवण्यात आला. गिरीश व मी या सर्वांमध्ये तंदुरुस्त
आणि जिद्दी.
माझ्या गिर्यारोहणातील कदाचित  सर्वात वाईट दिवस, काही न करता तंबूत बसून राहणे.
मी स्वतः चे सांत्वन करत विचार केला. मला हिमालयात मोहिमेला कोणी आणले तरी असते
का? एक हमाल म्हणून तरी आपल्याला हे सर्व बघता आले. आपल्या परीने आपण मदत केली.
मोहिमेच्या नेत्यांनी घेतलेला निर्णय आपण पाळायचा!


स्वानंद व प्रवीण दुसऱ्या दिवशी वर निघाले. ते केदारडोमच्या नॉर्थ रिज नी प्रयत्न करणार होते.
अर्थात..आम्ही वाहिलेला १०००' दोर आणि चढाईच्या  सामानाचा आता उपयोगच नव्हता.
गिरीश, बुद्धी व मला हे सर्व त्याच दिवशी खाली न्यायचे होते व कॅम्प १ ला परतायचे होते.


आम्ही बेस ला पोचलो, तेव्हा आम्हाला कळले की  मुंबई टीमचा केदारडोम वरील
प्रयत्न फसला होता. अतिशय दमलेल्या अवस्थेत ते बेसला परतले होते. 
लेदर बूट मध्ये ओल  शिरली होती आणि बुटाला लावायचे वॅक्स  वेळीच पोचले नव्हते.


कॅम्प १ ला पोचलो तेव्हा अतिशय उकाडा होता. तम्बूला अडकवलेले थर्मोमीटर
४० सेलशिअस दाखवत होते. पाय खाली भुसभुशीत बर्फ, तंबू कोसळलेले , अन या
सर्वांवर अतिशय गार  झोंबणारा वारा. यूव्ही  किरणांनी अतिरेक केला होता.
 कॅम्प समोर कीर्तीस्तंभ व भरते कुंठा  दिमाखाने आमची केविलवाणी अवस्था बघत होती.


आम्ही कॅम्प २ च्या परिस्थितीचा विचार करत होतो. दुसऱ्याच दिवशी समिट होणार होते.
मुंबईच्या मंडळीत २ हाई  अल्टी पोर्टर होते तरी देखील त्या टीमची अवस्था मी बघितली होती.
आमच्याकडून शिखर सर होणे मुश्किल होते.
बुद्धीसिंग  रात्रभर तंबू मध्ये खोकत होता. मी आता केवळ परतीचा विचार करत होतो.


कॅम्प १ चा शेवटचा दिवस 


अतिशय गर्मीमुळे हिमनदीने आता रुद्रावतार धारण केला होता.
बर्फ वितळून बारके नाले वाहू  लागले होते.
दगड व मातीचा चिखल  आणि काळा  ग्लेशियर.
गेले ४-५ दिवस अतिशय कमी जेवणामुळे आम्ही त्रस्त  होतो.
सकाळचा चहा स्विटेक्स च्या गोळ्या घालून. नाश्त्याला चिवडा व बिस्किटे.
दुपारचे जेवण म्हणजे दोन रुरु चपात्या गिट्स टोमॅटो सूप मध्ये बुचकळून.
रात्री भात आणि गिट्स टोमॅटो सूप.
कधी एकदा बेस ला परततो आणि मूग डाळ खिचडी खातो असे डोहाळे लागले होते.
ग्लेशीयर वर तंबू लावल्यामुळे खाली सगळे खडक.
वेड्यावाकड्या  दगडांमुळे पाठीचे हाल झाले होते आणि झोप बेताचीच व्हायची.
दुपारी भांडी धुवायला मी त्या बर्फाळ तळ्याकडे गेलो तेव्हा लांबून आमचे मित्र केदारडोम
वरून परतताना दिसले. आम्ही घाईघाईने त्यांच्या सॅक घ्यायला गेलो.
बुद्धीसिंगनी चहा बनवायला घेतला.


स्वानंद आणि प्रवीणचे चेहरे चांगलेच रापलेले होते. थोडेच सामान परत आणले होते
त्यामुळे दुसऱ्या दिवशी वर जाऊन उरलेले सामान आणणे भाग होते.
चहा घेत स्वानंद म्हणाला.


" आम्ही कॅम्प १ वरून पुढे निघालो. कीर्ती हिमनदी च्या पलीकडे पोचलो आणि
नॉर्थरिज च्या खाली कॅम्प २ लावला. विश्रांतीनन्तर पहाटे आम्ही शिखरावर जायला
निघालो.१९००० फूट  पर्यंत चढलो.कमरे एवढा बर्फ. अतिशय हळू हळू सरकत होतो.
ऊन लागल्यावर तर परिस्थिती बिकट झाली. छोटे छोटे avalanche येऊ लागले.
शेवटी परिस्थिती बघून परत वळायचे ठरवले."

मोहीम अयशस्वी झाली होती आणि या परिस्थितीत अजून प्रयत्न करण्यात फार अर्थ नव्हता.

बेस नावाचा  स्वर्ग !


पुढच्या दिवशी स्वानंद आणि मी कॅम्प २ गुंडाळून खाली आलो. कॅम्प २ वरून मेरू,
थलयसागर व शिवलिंग ही शिखरे अतिशय मोहक दिसत होती .
 कॅम्प १ गुंडाळून आम्ही प्रचंड ओझे घेऊन बेसला दाखल झालो. बेसवर बर्फ कमी झाले होते.
मुंबईची टीम मजेत होती आणि परतीची तयारी करत होती.  आम्हाला परत मूग डाळ खिचडी
खायला मिळाली व आत्मा तृप्त झाला.
दुसऱ्या दिवशी परतीचे पोर्टर मिळाले आणि आम्ही गाशा गुंडाळायला घेतला. 


गोमुखच्या समोरची भागीरथी एकमेकांना दोर बांधून क्रॉस केली कारण पाणी कमरे एवढे होते.
कमरेखालचा भाग इतका थंड पडला  की बराच वेळ आम्ही पाय चोळण्यात घालवला.
परत जाण्याची इच्छा प्रचंड असल्यामुळे तपोवनवरून थेट गंगोत्री गाठले.
रात्री ढाब्यावर  अमर्यादित जेवण. यावेळस, ढाबेवाल्याला तोटा झाला असावा,कारण
आम्ही महिन्याभराचा उपवास सोडला होता.


मोहीम संपायला अजून बराच प्रवास आणि हातचे बरेच दिवस उरले होते.स्वानंद च्या
डोक्यात बद्रीनाथ येथील नीलकंठवर मोहीम काढायचा विचार चालला होता व तो
बद्रीनाथ ला रवाना झाला. गिरीश व मी मसुरीला जाऊन आमच्या मित्राचे बूट साभार
परत केले. नंतर डेहराडूनहुन दिल्ली गाठले. सर्व मंडळीनी  पुणे गेस्ट हौस मध्ये आसरा
घेतला होता.
रात्री प्रवीणबरोबर मी करोलबाग  मधील तंदूर चिकन चाखायला बाहेर पडलो..
(माझी तंदूर खायची पहिलीच वेळ.) कॅनॉट सरकल मधून एक कॅसिओ चा छोटा
पियानो विकत घेतला.(या सर्व गोष्टी पुण्यात मिळत नसत.)


झेलम एक्स्प्रेस मधून परतीस निघालो आणि महिन्याची सुरुवात आठवली.
सर्व दगदग आता संपली होती. ५-६ महिन्यांची तयारी व्यर्थ ठरली होती.
परदेशातून आलेले गिर्यारोहक तर प्रचंड खर्च करून आमच्याही  पेक्षा वाईट परिस्थितीत होते.
गंगोत्रीतील सर्व मोहीमाँ फसल्या होत्या. फक्त पुण्याची एक मोहीम २०००० फूट खालील
एका खडकाळ शिखरावर यशस्वी झाली होती.  निसर्गाने दिलेला कौल मानण्याशिवाय
काहीच पर्याय नव्हता.


मी मागच्याच वर्षीच्या सतोपंथ मोहिमेचा विचार केला. 
ते परत फिरले असते तर आमच्या सारखे बचावले असते? 
जर- तर याने फारसा फरक पडत नसला,तरी योग्य वेळी परत फिरणे हाच तर खरा विजय.
अपघातात थोडक्यात वाचलेल्यांच्या  गोष्टी चवीने सांगितल्या जातात..पण थोडक्यात
दगावला तर त्याला बेजबाबदारपणाचे  लेबल  किती पटकन लावले जाते.
योग्य वेळकशी ठरवायची?
माझ्यासाठी जी वेळ  योग्य असेलतीच दुसर्यासाठी का असावी ?
प्रत्येकानी स्वतः चा निर्णय घ्यावा का? जसा हेमंत व भूषणने बेस वर राहायचा घेतला होता?
अन्नपूर्णा वरील टेरे - हरझॉगची मुलाखत आठवली .
फ्रॉस्ट बाईट होऊन बोटे घालवण्या इतके शिखर गाठणे  आवश्यक होते काय?
शिखरावर घेतलेले निर्णय चूक व बरोबर ठरवणे अयोग्य आहे .

त्या निर्णयामुळे   झालेली शिक्षा भोगताना, त्याची कठोरता लक्षात येते, पण वेळ गेलेली असते.
या मोहिमेची गोष्ट काही फारशी थरारक नाही,कारण यातील  "प्रसंगामध्ये " फारसा दम नाही.
योजनेत अनेक मोठ्या चुका झाल्या पण या मुळे  पुढील मोहीमा  सुरळीत होण्याची शक्यता
वाढली . हिमालयात परत जायचा विचार माझ्या डोक्यातून (काही दिवसांसाठी) नाहीसा झाला होता!

(हरून -अल -रशीद ला पोहोचताच, सिंदबाद दुसऱ्या सफरीचा विचार करू लागला.)