स्वानंद
पहिल्याच भेटीत आनंद भुरळ पाडणारया काही व्यक्तीपैकी एक. गोरा वर्ण, झिपरे केस कपाळावर उतरलेले, रुंद खांदे, पण उंची सामान्य असल्यामुळे दिसल्याला अजून बळकट, काळ्या फ्रेम चा चष्मा नाकावर नाचवत, डोळे बारीक करून मुक्त हास्याने चेहेरा खुललेला. ‘मी पेंडसे . स्वानंद पेंडसे ’. मला जेम्स बॉंड आठवल्यावाचून राहवलं नाही.
मी माझी ओळख करून दिली आणि म्हणालो, “तुमच्या बद्दल बरेच चांगले ऐकले आहे. एक उत्तम गिर्यारोहक म्हणून.” स्वानंद म्हणाला, “हो. मी वर्षातून एकदा मोहिमेवर जातो. आणि तू ट्रेक वगैरे करतोस?”
मी उत्तरलो, “ दोनच ट्रेक केले आहेत. साइकल वरून बराच हिंडलो आहे.”
आनंद, “ पुढच्या आठवड्यात मी ट्रेक घेऊन लोणावळाला जात आहे. तू ही येऊ शकतोस.”
त्या गुरवारी लोकलने लोणावळ्यास निघालो, तेव्हा स्वानंदचे साहेब आणि त्यांचा मुलगा ही आमच्या बरोबर होता. दिवसभरात duke's nose ला जाऊन परत येई पर्यंत, स्वानंदशी मैत्री झाली आणि पुढील ट्रेकची तयारी सुरु झाली. मित्रांकडून काही माहिती मिळाली आणि कळले काही अजबच.
स्वानंदचे वडील , दोन भाऊ आणि आई सदाशिव पेठेत राहतात. स्वानंद काही वर्ष, त्यांच्या पासून वेगळा राहतो. मोठा भाऊ सीए. लहान भाऊ माझ्या एवढा. इंदिरा बाईंच्या इमेर्जेनसी मध्ये काही वेळ आत टाकला होता. बाहेर आल्यावर वडिलांनी चार शब्द सुनावल्यावर हा तडक घराबाहेर पडला आणि मामा च्या अंगणात बिस्तर टाकला. इंटर पर्यंत शिकला होता. टाटा मोटर्स मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून लागला आणि होस्टेल वर राहिला गेला. मोडेन पण वाकणार नाही अशी वृत्ती.
स्वानंद दोन महिने रजेवर होता. उगवला तेवा दाढी वाढलेली आणि चेहेरा रापलेला. भेटल्यावर स्लाईड शो चे निमंत्रण मिळाले. टिळक रोड वरील एका ठिकाणी मी शो बघायला गेलो तर खचाखच गर्दी. शेवटी बसायला एक खुर्ची मिळाली. आनंदने बोलण्यास सुरुवात केली आणि सर्व मंत्रमुग्ध. advance course करून हा अवली अजून तिघांना घेऊन थेलू शिखर एकही पोर्टर ना घेता एकटाच चढून आला होता. सुंदर छायाचित्रण आणि लोकांना खिळवून ठेवेल असे बोलणे. मला ही यानंतर हिमालयात जावेसे वाटायला लागले. पुण्यामध्ये alpine style चे वारे वाहू लागले व त्याचे श्रेय स्वानंद ला देण्यास हरकत नाही. पुढील पिढीतील गिर्यारोहण चालू ठेवण्यासाठी आम्हा काही मित्रांना त्याने शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले.
गिर्यारोहक नसलेल्या मंडळीवर कसा रोब जमवावा हे या कडून शिकावे. कोणी बिचारा भटकला आणि त्याने विचारलेच, "कसला विचार करतोस स्वानंद?" तर उत्तर,“मला फक्त केदारनाथ शिखराचा उभा कडा दिसतो. १५०० फूट दोर पायथ्यापार्यांता कसा न्यायचा.” असे म्हणत पाईप मध्ये तंबाकू भरत देव आनंद , लष्करात कर्नल असल्याचा अविर्भाव. समोरची व्यक्ती तानाजी कडा नजरेसमोर आणून मनातले दोर बांधायचा प्रयत्न करत.
साहेब पाईप ओढायचा म्हणून हा ही पावलावर पाउल. तमाखू घालण्यापूर्वी आतील राख कोरत बसायचे. समोरच्या व्यक्तीच्या वेळेची कदर नाही आणि आपला साहेबी शौक दाखवून भाव मारायची हीच वेळ.
कामावर, स्वानंद फारसा संतुष्ट नव्हता कारण त्याची वाढ खुंटली होती. आम्हाला सारखे 'ली अयाकॉका ' आणि 'आय.बी.एम वे' मधील उदाहरणे देत असत. त्याचे, कितव्या वर्षी काय अवगत करायचे, हे देखील ठरलेले.
‘तिशीच्या आत घरी कंपनीची कार हवी नाही तर जीव द्या’. (स्वानंद २८ वर्षाचा होता.)
कुठल्यातरी पुस्तकात याने वाचले होते (आणि खरे ही असेल), की रिसर्च मधला माणूस कधी ही CEO होत नाही. तो असावा लागतो मार्केटिंग किवा प्रोडक्षन मधला. या नंतर याने स्वतः ची बदली मरीन इंजिन विकणाऱ्या विभागात करून घेतली. मी स्वानंद चा आटापिटा बुळ्या सारखा बघत होतो. (त्याच्या दृष्टीने माझ्यात फारसा ‘दम’ नसावा, कारण डिप्लोमा संपल्या नंतरचा ‘प्लान’ माझ्याकडे नव्हता.)
स्वानंद चे लग्न झाले. त्याबरोबेरच्या माझ्या दोन मोहिमा अयशस्वी झाल्या. माझे त्याच्याशी थोडेफार खटके उडायला लागले. alpine style ला मी काही आता नवा नव्हतो. त्याच्या स्लाईड शो मधील व्यवस्थित झाकलेल्या गोष्टी दिसल्या आणि मला फसल्या सारखे वाटले. advance course चे ट्रेनिंग याने थेलू शिखरावर केले होते. एक आठवड्याने परत चढले तर काय अवघड? त्यात याने course मधील काही जेवण पण दगडाखाली दडपून ठेवले होते आणि course ही याच शिखरावर झाला होता . खात्रीशील विजय मिळणार होता! सामान्य माणसाला हे कळलेच नसते. गाजा वाजाचा मला त्रास होऊ लागला.
मध्ये स्वानंद पुण्यात आला, तेव्हा भेटायला गेलो. “जर्मनीच्या कंपनीत ट्रेनिंग घ्यायला जात आहे. आजच ‘वान हुसेन’ मध्ये खरेदीला गेलो होतो. तीन महिन्यांनी भेटू.” एम. जी . रोड वरील दुकानात पाय ठेवायची माझी लायकी नव्हती, त्यामुळे मी एकदम प्रभावित. मला एक सावध करण्यासाठी एक सल्ला , “गिर्यारोहणात आयुष्य ओवाळून टाकू नकोस. आयुष्याच प्लानिंग जास्त महत्वाचे.”
स्वानंदशी त्यानंतर फार संबंध राहिला नाही. कागद बनविण्यासाठी यंत्र बनविणाऱ्या कंपनीत तो सेल्स हेड होता. घरी बहुदा गाडी वगैरे अली असावी.(कंपनीची) स्वानंद नी पुण्यात अपार्टमेंट घेतलेला होता. थोरला भाऊ व त्याचे कुटुंब आणि आई याच घरात राहायचे. अर्थातच, अशा ठिकाणी अपार्टमेंट घेणे मला ऐपती पलीकडे होते.
माझे लग्न झाले आणि गिर्यारोहण काहीसे बंद पडले. मला काही कारणांनी नोकरी बदलावी लागली. अजून वाटते की या निर्णयात स्वानंदच्या थोडा तरी हातभार असावा. माझे मित्र मंडळी ही विविध ठिकाणी पसरली. एकदा सगळे पुण्यात असताना आम्ही भेटायचे ठरवले. हॉटेल मध्ये चहाचे प्याले रिचवीत आम्ही गप्पा मारत होतो. स्वानंदला मी नोकरी बदलल्याचे जरा जास्त आश्चर्य वाटले. “तू कधी आय. टी. मध्ये जाशील हे वाटले नव्हते.” मी त्याला काही मोहिमांबद्दल सांगितले. गिर्यारोहणात फारसा रस राहिला नसावा, हे मी जाणले आणि विषय बदलला. तो इम्पोर्ट करून फिल्टर्स भारतात विकतो हे कळले. परिस्थिती बेताची वाटली.
एकूण एका गोष्टीचे समाधान वाटल्या वाचून राहवले नाही की, मी आयुष्यात फारसे प्लानिंग न करता बऱ्यापैकी “श्रीमंतीत” होतो. स्वानंदच्या अश्चार्यामागे हेच कारण असावे. त्यानंतर मी कधीच संबंध ठेवायचा प्रयत्न केला नाही. मधेच कधीतरी कळले कि त्याचा मोठा भाऊ आणि वहिनी दिवंगत झाले. ऐकून फार वाईट वाटले कारण ते एकत्र कुटुंब मी जवळून पहिले होते.
काही वर्षांपूर्वी, एका अफवेत गिर्यारोहण करताना माझ्या मृत्यूची वार्ता पसरली आणि स्वानंदला ती समजली. मी सुखरूप परतल्यावर तो घरी भेटायला आला. त्यांनी माझा गिर्यारोहण मास्तर असल्यामुळे ताबा घेतला आणि संपूर्ण गोष्ट ऐकून घेतली. त्यानंतर काही प्रश्न विचारले आणि म्हणाला, “acclimatization” नीट नाही केले म्हणून दोन जीव गेले.” मी वाद घालायाच्या मनस्थितीत नव्हतो. परिस्थिती नीट माहित नसताना काही निवृत्त गिर्यारोहकांनी आमच्या मोहिमेबद्दल वेगळे विचार मांडले होते. जुना मास्तर म्हणून स्वानंद काही बोलत होता आणि मी काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतो. या माणसानी काय केले असते हेच मनात घोळत होते.
जाताना बायकोला उद्देशून म्हणाला, “अजून ह्यांनी गिर्यारोहण सोडावे, असे मला वाटत नाही.”
मी माझा निर्णय घेतलेला होता , गिर्यारोहणाला पूर्णविराम. आता फक्त मेरेथोन.
एक हितचिंतक म्हणून, मी मेरेथोन झाली, की मी स्वानंद ला कळवीत असे.
एकदा असाच त्याचा फोन आला. “एक प्रोजेक्ट आहे. भेटायला ये.”
मला स्वतःच्या घरी बोलावले नव्हते.. एका घराच्या पार्किंग मध्ये यांनी ऑफिस उघडले होते. नंतर १:३० तास मला कागद बनवायच्या प्रोसेस मधे पाणी कसे वाचवता येऊ शकते, यासाठी एका फिल्टर चे रेखाटन दाखवले. एका संशोधकासारखा तो पटवण्याचा प्रयत्न करत होता. मला त्यात चुका दिसत होत्या आणि त्या मी दाखवण्याचा प्रयत्न करत होतो, पण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. मार्केटिंग मधील पटवा पटवी चुकीच्या माणसासमोर.
आज पर्यंत मी या व्यक्तीचे सर्व ऐकत आलो होतो. प्रोजेक्ट चुकीचा होता पण दिसत होते की याचा स्वतःवर विश्वास आहे. “ मला ६ लाखाचे भांडवल लागणार आहे. त्यामुळे मी मित्रांना विचारात आहे. १७% व्याज मी दिले तरी घ्यायचे हं .” स्वानंदनी सिगारेट सोडली होती. बी. पी. मुळे.
मला एक आयुष्यात पूर्णपणे फसलेला माणूस दिसत होता. माझ्या चेहेर्यावर त्याला दिसले असावे. “आज मी ५५ वर्षाचा आहे. जर प्रोजेक्ट फसले तर नोकरी करून ४ वर्षात सगळ्यांचे पैसे परत. सर्व पैसे एकाच व्यक्तीकडून घेतले तर हिंडावे लागणार नाही. प्रोजेक्ट वर फोकस करता येईल.”
माझ्या माहितीनुसार स्वानंद नी पी .एफ. आधीच रिकामे केले होते.
मला दिसत होती याची सौभाग्यवती आणि मुले. काही दिवसांनी इकडून तिकडून मित्रांनी सांगितले कि याची परिस्थिती वाईट आहे. माझ्यासारखाच इतरांना गाठून परिवाराला न कळू देता .......
मला दिसत होता पूर्वीचा स्वाभिमानी स्वानंद. अल्पाईन मोहिमा आखणारा. आवाक्याबाहेरची ध्येय गाठायची इच्छा बाळगणारा. कायम प्रगतीकडे लक्ष ठेवणारा. लोकांना बोलून गुंग करणारा.
माझ्या पेक्षा अतिशय निराळा.
खूप लवकर प्रगती करणारे मित्र बघितले, की वाटते सावध करावे आणि दुसरी बाजू पण सांगावी. पण अनुभव हेच सांगतो ..असे लोक माझे सांगून थोडेच ऐकणार आहेत. माझी शेवटची मोहीम आणि त्यात दगावलेले माझे मित्र आठवतात.
बर्नऔट चा वेग प्रगती एवढ्याच तीव्र गतीने होतो . या सगळ्या 'प्लानिंग' मध्ये आयुष्य मजेत जगायचे राहून जाते. हे सर्व केस पिकल्यावर जाणवते.